हरियाणा विधानसभेची निवडणूक ऐन रंगात आली असताना गटातटामध्ये विभागलेल्या काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेत्या कुमारी शैलजा यांच्या मौनाने पक्षाची चिंता वाढवली आहे. माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांच्याशी त्यांचं पटत नसल्याचं दावा केला जात आहे. त्यामुळे आता कुमारी शैलजा या भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहेत. त्यातच हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही कुमारी शैलजा यांना भाजपात येण्याची ऑफर दिली होती. दरम्यान, या सर्व घटनाक्रमावर बराच वेळ मौन बाळगल्यानंतर कुमारी शैलला यांनी उत्तर दिलं.
कुमारी शैलजा यांनी त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की, माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. मी काँग्रेस पक्ष सोडून कुठेही जाण्याचा विचारही करू शकत नाही. त्यामुळे भाजपा आणि मनोहरलाल खट्टर यांनी अफवा पसरवणं बंद करावं, असे कुमारी शैलजा यांनी सुनावले. दरम्यान, हरियाणामध्ये काँग्रेसकडून प्रचारासाठीचा कार्यक्रम निश्चित झालेला नाही. मात्र मागच्या एक आठवड्यापासून कुमारी शैलजा ह्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून दूर आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
दरम्यान, हरियाणामध्ये कांग्रेसचे अनेक गट आहेत. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा आणि माजी केंद्रीय मंत्री कुमारी शैलजा यांच्या गटांमध्ये कधीही पटत नाही. यावेळी दोन्ही नेते आणि त्यांच्या समर्थकांकडून मुख्यमंत्रिपदावर दावा केला जात आहे. मुख्यमंत्रिपदावर आपला हक्क आहे, असे कुमारी शैलजा स्पष्टपणे सांगत आहेत. तर दोन्ही नेत्यांमधील संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मागच्या काही दिवसांमध्ये या दोघांमधील वाद आणखीनच चिघळला. मात्र मागद्या काही दिवसांपासून दोन्ही नेद्यांमधील अंतर सातत्याने वाढत चाललं आहे. त्यामुळे हरियाणामधील मतदान काही दिवसांवर आलं असताना काँग्रेसची चिंता वाढली आहे.