दहा वर्षांच्या कार्यकाळानंतर सरकारविरोधी लाटेचा सामना करत असलेल्या भाजपा आणि सत्तेची चाहूल लागलेल्या काँग्रेसमध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत झाली होती. दरम्यान, आज संध्याकाळी मतदानाची प्रक्रिया आटोपल्यानंतर राज्यात कोण बाजी मारणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. दरम्यान, मतदान आटोपल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या विविध एक्झिट पोलमधून हरियाणामधून सत्ताधारी भाजपाची एक्झिट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेस राज्यात जोरदार मुसंडी मारणार असल्याची आकडेवारी समोर आली आहे. हरियाणामध्ये काँग्रेसला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. तर भाजपाची जबरदस्त पिछेहाट होणार,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आज हरियाणातील मतदान आटोपल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या प्रमुख एक्झिट पोलपैकी इंडिया टुडे-सी व्होटरच्या आकडेवारीनुसार काँग्रेसला ५० ते ५८, भाजपाला २० ते २८, जेजेपीला ० ते २ आणि इतरांना १० ते १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर एबीपी न्यूज मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार विधानसभेच्या ९० जागांपैकी ५५ ते ६२ जागांवर काँग्रेसचा विजय होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजपाला १८ ते २४ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. इतरांना २ ते ८ जागा मिळण्याची शक्यता आहे.
तर न्यूज १८ च्या एक्झिट पोलनुसार हरियाणामध्ये काँग्रेसला ५९, भाजपाला २१ आणि इतरांना १० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच भारत रिपोर्ट्स पोलनुसार काँग्रेसला ४४ ते ५४, भाजपाला १९ ते २९, आयएनएलडीला १ ते ५, जेजेपीला ० ते १ आणि इतरांना ४ ते १० जागा मिळण्याची शक्यता आहे. -----------------------------------------------------------------------