हरियाणामध्ये लवकरच निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने तेथील निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्याने तिकीट मिळवण्यासाठी स्पर्धा होऊ लागली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांचे जावई चिरंजीव राव यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी दावा केला आहे. अद्याप तिकीट जाहीर झालेले नसताना हा दावा करण्यात आला आहे. चिरंजीव राव हे रेवाडी येथील आमदार आहेत.
चिरंजीव राव यांनी दावा करताच राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली. रेवाडीतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत चिरंजीव राव म्हणाले की, काँग्रेसला ७५ जागांच्या पुढे नेण्याचे काम आम्ही करू. चिरंजीव मंत्री किंवा उपमुख्यमंत्री होणार, असे सध्या लोक म्हणत आहेत. पण मला सांगावेसे वाटते की, तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असेल आणि माझा तरुणवर्ग माझ्या पाठीशी असेल तर मी तुम्हाला आमदार करीन आणि मी उपमुख्यमंत्री म्हणून काम करेन, याची ग्वाही देतो.
चिरंजीव यांचा मोठा दावा
तसेच चिरंजीव राव यांनी आपण कोणत्या दिवशी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले आहे. निवडणुकीत त्यांना तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, ओबीसी अध्यक्ष असल्याने ओबीसी समाजातील नेत्यांना अधिकाधिक तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांचे वडील अजयसिंह यादव यांनी सांगितले.
हरियाणामध्ये १ ऑक्टोबरला विधानसभेची निवडणूक होत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गेल्या आठवड्यात ही घोषणा केली. ४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. हरियाणात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. सध्या येथे भाजपचे सरकार आहे. राज्यात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये असली तरी आम आदमी पार्टी, इंडियन नॅशनल लोकदल, जेजेपी आणि बसपा या पक्षांची कामगिरी लक्षणीय ठरेल.