हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच आयएनएलडी आणि जेजेपी हे पक्षही रिंगणात असतील. दरम्यान, मागच्या विधानसभा निवडणुकीत १० जागा जिंकून किंगमेकर बनलेला दुष्यंत चौटाला यांचा जेजेपी पक्ष यावेळी अस्तित्वाची लढत लढत आहेत. अनेक आमदारांनी पक्षाची साथ सोडली आहे. तर दुष्यंत चौटाला हेसुद्धा भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, या चर्चांबाबत दुष्यंत चौटाला यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
२०१९ च्या निवडणुकीत १० आमदार निवडून आल्यानंतर जेजेपी पक्ष भाजपासोबत सत्तेत सहभागी झाला होता. तर दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री बनले होते. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासोबतची युती तुटल्यापासून दुष्यंत चौटाला आणि त्यांचा पक्ष मोठ्या अडचणीत सापडला आहे. काही आमदारांना पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर दुष्यंत चौटाला यांनी पक्षाच्या कामगिरीबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. ते म्हणाले की, मी या घटनाक्रमाकडे संकट म्हणून पाहत नाही. जे झालं ते झालं. आता मी याकडे एक संधी म्हणून पाहत आहे. मागच्या वेळी आमचा पक्ष किंगमेकर बनला होता. पुढच्या काही दिवसांत जेजेपी हरियाणामधील महत्त्वाचा राजकीय पक्ष बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपल्या भाजपा प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांबाबत स्पष्टीकरण देताना दुष्यंत चौटाला म्हणाले की, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की, मी भाजपामध्ये जाणार नाही. यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीत सहभागी होण्याबाबत विचारले असता दुष्यंत चौटाला यांनी सांगितले की, जर आमच्या पक्षाचा प्राधान्यक्रमाने विचार झाल्यास आम्ही इंडिया आघाडीसोबत जाण्याचा विचार का करू नये?
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जननायक जनता पक्षाची कामगिरी अपेक्षित अशी झाली नव्हती. २०१९ मध्ये जेजेपीने ८७ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यात १० जागांवर त्यांना विजय मिळाला होता. आता हरियाणामध्ये १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर ४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.