दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे हरियाणाचे सुपुत्र असल्याचं सांगत त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. सत्ताधारी भाजपाच्या विरोधात उभं राहण्यासही सांगितलं. सुनीता केजरीवाल यांनी दावा केला की, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना खोट्या प्रकरणात जेलमध्ये टाकण्यात आलं आहे. तुमचा मुलगा सिंह आहे, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे झुकणार नाही, असंही त्या म्हणाल्या.
जाहीर सभेला संबोधित करताना सुनीता केजरीवाल म्हणाल्या, "मी, तुमची सून असून हरियाणा हा अपमान सहन करेल का, हे विचारू इच्छिते. तुम्ही गप्प राहाल का? आणि तुमच्या मुलाला साथ देणार नाही का? सुनीता यांनी आरोप केला की, त्यांना फक्त सत्तेत राहायचं आहे आणि त्यांना समाजाच्या कल्याणासाठी काम करण्यात रस नाही. पक्ष फोडायचे आणि विरोधी नेत्यांना जेलमध्ये टाकायचं हेच भाजपाला माहीत आहे.
"भाजपाला फक्त सत्तेत राहायचंय"
सुनीता केजरीवाल यांनी लोकांना भाजपाला एक मतही मिळणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलं. भाजपावर निशाणा साधत त्यांनी गेल्या दहा वर्षांत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काय सुधारणा झाल्या याबाबत लोकांना विचारलं. सरकारी शाळांची स्थिती सुधारली आहे का? तुमच्या परिसरात असे कोणतेही हॉस्पिटल आहे का जिथे चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे?, मोफत औषधे दिली जातात का आणि तुम्हाला २४ तास वीज मिळते का? दिल्ली आणि पंजाबमध्ये या सुविधा दिल्या जात आहेत, जिथे आम आदमी पार्टीची सत्ता आहे. भाजपाला फक्त सत्तेत राहायचं आहे असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला.
"अरविंद केजरीवाल हरियाणाचे सुपुत्र"
अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी म्हणाल्या की, "पक्ष फोडायचे आणि विरोधी नेत्यांना जेलमध्ये टाकायचं हे फक्त भाजपालाच माहीत आहे. त्यांना (भाजपा) समाजाच्या हितासाठी काम करण्यात रस नाही. अरविंद केजरीवाल हे हरियाणाचे सुपुत्र असून त्यांचा जन्म सिवानी गावात झाला आणि हिसारमध्ये झाला आहे."
"हरियाणाचा मुलगा दिल्लीचा मुख्यमंत्री होईल, याची कल्पनाही कोणीही केली नसेल आणि ही गोष्ट एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. १६ ऑगस्ट १९६८ रोजी अरविंद यांचा जन्म झाला. त्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी होती. मला वाटतं की, अरविंद यांच्या माध्यमातून देवाला काही खास करायचं होतं आणि त्यांनी शून्यापासून सुरुवात केली, आपला पक्ष उभा केला आणि पहिल्याच निवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. केजरीवाल यांनी अशी कामं केलीत, जी मोठे पक्ष आणि मोठे नेते कधीच करू शकले नाहीत."