हरियाणा विधानसभा निवडणुकीत कुस्तीपटू विनेश फोगाटच्या उमेदवारीनंतर जुलाना मतदारसंघ चर्चेत आला आहे. काँग्रेसने कुस्तीपटू विनेशला उमेदवारी दिली आहे. एसडीएम कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विनेशने आज तकशी संवाद साधला. "मी आता लढाईच्या मूडमध्ये आहे. सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं आहे. आपण प्रत्येक कार्यकर्त्याचा आदर केला पाहिजे."
"मी आता कुस्तीकडे परत जाऊ शकत नाही. माझ्यावर जबाबदाऱ्या आहेत. मी फुल टाईम राजकारणी आहे. माझे विरोधक कोण आहेत, याची मला पर्वा नाही. त्यांची कमजोरी काय आहे ते मी पाहिन. गोपाळ कांडा यांना समर्थन दिल्याने भाजपा नेहमीच गुन्हेगारांच्या पाठीशी असल्याचं दिसून येतं" असं विनेश फोगाटने म्हटलं आहे.
जींद जिल्ह्यातील जुलाना मतदारसंघातून काँग्रेसने विनेश फोगाट, भाजपाने कॅप्टन योगेश बैरागी आणि जेजेपीने विद्यमान आमदार अमरजीत सिंह ढांडा यांना उमेदवारी दिली आहे. आम आदमी पक्षाने कविता दलाल यांना तिकीट दिलं आहे. जींद जिल्ह्यातील ही जागा भाजपाने कधीही जिंकलेली नाही. २००५ मध्ये काँग्रेसने ही जागा जिंकली होती.
आम आदमी पार्टीने WWE महिला रेसलर कविता दलाल यांना उमेदवारी दिली आहे. कविता दलाल यांनी काही दिवसांपूर्वी 'आप'मध्ये प्रवेश केला होता. जींद जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कविता या उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बिजवाडा गावची सून आहेत. त्या WWE मधील भारतातील पहिल्या महिला रेसलर आहेत.