...त्यामुळे हरियाणामध्ये होऊ शकली नाही कांग्रेस आणि आप यांची आघाडी, समोर आलं मोठं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 10:47 AM2024-09-10T10:47:53+5:302024-09-10T10:48:37+5:30
Haryana Assembly Election 2024: हरियाणामधील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. तसेच सर्वच पक्षांनी ही निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये आघाडी होणार असल्याची चर्चा सुरू होती.
हरियाणामधील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. तसेच सर्वच पक्षांनी ही निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये आघाडी होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही दोघांमधील आघाडी काही होऊ शकली नाही. दरम्यान, आपने सोमवारी हरियाणा विधानसभेसाठी आपल्या २० उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये आता काही आघाडी होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यामध्ये आघाडी न होण्यामागचं सर्वात मोठं कारण समोर आलं आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून झालेले मतभेद हे त्यामागचं महत्त्वाचं कारण असल्याचं बोललं जात आहे. आम आदमी पक्षाने काँग्रेसकडे १० जागांची मागणी केली होती. या जागा पंजाब आणि दिस्लीला लागून असलेल्या जिल्ह्यांमधील होत्या. मात्र या जागा देण्यास काँग्रेस फारशी इच्छुक नव्हती. दरम्यान, काँग्रेसने आपला ३ ते ५ जागा देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच या जागा ह्या भाजपाची ताकद असलेल्या होत्या. त्यामुळे चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही काँग्रेस आणि आपमधील जागावाटप होऊ शकलं नाही.
एवढंच नाही तर काँग्रेसचे हरियाणामधील प्रदेशाध्यक्ष उदयभान आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा हे सुद्धा आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्यास फारसे इच्छूक नव्हते. काँग्रेसच्या इतरही काही नेत्यांनी आपसोबतच्या आघाडीला विरोध केला. आम आदमी पार्टीचे स्थानिक नेतेही या आघाडीच्या विरोधात होते. त्याशिवाय हरियाणामध्ये स्वबळावर लढल्यास कुठलंही नुकसान होणार नाही, याची खात्री काँग्रेसला आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाने ९० जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी आधीच केलेली आहे. तसेच त्यापैकी २० उमेदवारांची घोषणाही केली आहे. दरम्यान, हरियाणा विधानसभेतील सर्व ९० जागांवर ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.