Haryana Assembly Election : चंदीगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धामधून सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर जननायक जनता पक्ष (जेजेपी) आणि आझाद समाज पक्ष (कांशीराम) या युतीचे सरकार स्थापन झाल्यास हरियाणातील गर्भवती महिलांसाठी 'लाडली बेबी योजना' लागू करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. तसेच, या योजनेंतर्गत गरोदर महिलांची काळजी आणि आहारासाठी दरमहा पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय, अंगणवाडी आणि आशा सेविकांचे मानधनही दरमहा २१ हजार रुपये करण्यात येणार आहे. यासंदर्भात जेजेपीच्या ज्येष्ठ नेत्या आणि आमदार नैना सिंह चौटाला यांनी घोषणा केली.
नैना चौटाला शनिवारी उचाना येथील अलेवा गावात आयोजित हरी चुनरी चौपाल कार्यक्रमात जमलेल्या महिलांना संबोधित करत होत्या. त्यावेळी, महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जेजेपीने पंचायत राज संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण लागू केले होते आणि आता आमचे सरकार आल्यास शिक्षक भरतीतही महिलांना ५० टक्के आरक्षण दिले जाईल, असे नैना चौटाला यांनी सांगितले. तसेच, उपमुख्यमंत्री असताना दुष्यंत चौटाला यांनी महिलांच्या मान-सन्मानात कधीही कमीपणा येऊ दिला नाही, असेही नैना चौटाला म्हणाल्या.
याचबरोबर, महिलांनी एकजूट होऊन उचाना येथून दुष्यंत चौटाला यांना विजयी करा आणि त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी राज्यभरात चावी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा, असे नैना चौटाला म्हणाल्या. तसेच, एकीकडे जेजेपी महिलांना सोबत घेऊन पुढे जात आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नेते बीरेंद्र सिंह यांनी महिलांना वांझ म्हणत आईच्या गर्भाचा अपमान केला आहे. महिलांना वांझ असा दर्जा देणारे काँग्रेसवाले कधीच महिलांना सन्मान देऊ शकत नाहीत, त्यामुळे महिलांनी मतदान करूनच आपल्या अपमानाचा बदला घ्यावा, असे नैना चौटाला म्हणाल्या.
७५ टक्के रोजगाराचा कायदा करण्यात आला होता नैना चौटाला म्हणाल्या की, दुष्यंत चौटाला यांनी ७५ टक्के रोजगाराचा कायदा तरुणांच्या हितासाठी केला होता, मात्र भाजपने त्यात वारंवार अडथळे आणले. तसेच, चौधरी देवी लाल यांनी १०० रुपयांपासून सुरू केलेली वृद्धापकाळ पेन्शन आज दुष्यंत चौटाला यांनी ३,००० रुपये प्रति महिना केली. उचाना येथील जनतेने नेहमीच दुष्यंत चौटाला यांना आपला लाडका मानून पुढे नेण्याचे काम केले आहे आणि दुष्यंत चौटाला यांनाही नेहमीच हरियाणा आणि उचानाच्या विकासाचा विचार केला आहे, असे नैना चौटाला यांनी सांगितले.