मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2024 05:36 AM2024-10-09T05:36:46+5:302024-10-09T05:39:02+5:30
भाजपने स्वतःही असा विचार केला नव्हता की, तिसऱ्यांदा हरयाणात कमळ फुलेल; पण निवडणुकीच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, यंदा हरयाणात जाट-बिगर जाट मतदारांमध्ये ध्रुवीकरण झाले.
आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: हरयाणात सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार सत्तारूढ होणार आहे. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच कोणालाही या निकालाची अपेक्षा नव्हती. भाजपने स्वतःही असा विचार केला नव्हता की, तिसऱ्यांदा हरयाणात कमळ फुलेल; पण निवडणुकीच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, यंदा हरयाणात जाट-बिगर जाट मतदारांमध्ये ध्रुवीकरण झाले आहे.
काँग्रेसने भूपेंद्रसिंह हुड्डा यांना पुढे केले खरे; पण कुमारी शैलजा यांची नाराजी जगजाहीर होती. याचा फायदा भाजपला झाला. काँग्रेसच्या परंपरागत मागास समुदायाच्या मतदारांनी आपले समर्थन बिगर जाटच्या बाजूने दिले आणि भाजपच्या बाजूने झुकते माप दिले.
तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत संविधानाचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे मागास समुदायाच्या मतदारांनी इंडिया आघाडीला समर्थन दिले होते; पण हरयाणात मागास समुदायाचे मत बिगर जाटच्या बाजूला सहभागी झाले आहे. याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे काँग्रेसने जाट चेहरा असलेले भूपेंद्रसिंह हुड्डा यांना पुढे केले होते.
शैलजा आणि हुड्डा यांची हातमिळवणी राहुल गांधी यांनी केली खरी; पण त्यांची मने मिळाली नाहीत आणि दोघांच्या वादाने काँग्रेसला तिसऱ्यांदा हरयाणात सत्तेतून बाहेर राहावे लागले. हरयाणात आता काँग्रेसला जाट समुदायाच्या पलीकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.