०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 05:46 AM2024-10-09T05:46:07+5:302024-10-09T05:47:35+5:30
मायावतींची जादू गायब, छोटे पक्ष उरले फक्त मते खाण्यासाठी
चंडीगड : हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला ३९.९३ टक्के मते मिळाली असून, ४८ जागांवर उमेदवार निवडून आले आहेत. त्याच वेळी काँग्रेसलाही जवळपास तितकीच म्हणजे ३९.०९ टक्के मते मिळाली असताना काँग्रेसचे ३७ उमेदवार जिंकले आहेत. त्यामुळे अतिशय कमी मतांच्या फरकाने काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला असून, यासाठी छोटे पक्ष कारणीभूत ठरल्याचे आकडेवारीतून लक्षात येते.
हरयाणात २.०४ कोटी मतदार मतदानासाठी पात्र होते. येथे ६५ टक्के मतदान झाले होते. भाजपचे १० आमदार ५ हजारांपेक्षा कमी फरकाने जिंकून आले आहेत. २ हजारपेक्षा कमी मतांनी १ आमदार जिंकले आहेत. याचवेळी काँग्रेसचे ३ आमदार २ हजारपेक्षा कमी मतांनी निवडून आले आहेत. १ हजारांपेक्षा कमी मतांनी १ आमदार निवडून आले, तर ५ हजारांपेक्षा कमी मतांनी २ आमदार निवडून आले आहेत.
मायावतींच्या बहुजन समाज पक्षाची जादू चाललेली नाही. या निवडणुकीत नोटाला मतदारांनी नाकरले असून, केवळ ०.३८ टक्के मते नोटाला मिळाली आहेत.
भाजप का जिंकली?
हरयाणाच्या राजकारणात जाट अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे. शेतकरी आंदोलन आणि नंतर कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे जाट मतदार भाजपवर नाराज होते. भूपेंद्रसिंग हुड्डा यांच्यामुळे काँग्रेसला जाट मते जास्त मिळतील, असे मानले जात होते. अशा परिस्थितीत भाजपने ओबीसींना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला.
गोड जिलेबी राहुल गांधींसाठी ठरली कडू
निवडणुकीत काँग्रेस हरण्याच्या मार्गावर असताना, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वत्र जिलेबीचीच चर्चा सुरू झाली. राहुल गांधींनी हरयाणाच्या प्रचारादरम्यान मातुरामच्या जिलेबीचा उल्लेख केला होता. काँग्रेस नेते हुड्डा यांनी गोहाना शहरातील लाला मातुराम हलवाई या लोकप्रिय दुकानातील जिलेबी राहुल गांधींना भेट म्हणून दिल्या होत्या. त्यावर आज मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम जिलेबी खाल्ली आहे. प्रत्येकाला ही जिलेबी खायला मिळाली पाहिजे. त्यामुळे कारखान्यात जिलेबी तयार करणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे जिलेबी हा राजकीय विजय बनला. भाजपनेही यानंतर त्यांना ट्रोल केले.
जजपाचा ‘किंगमेकर’ ते थेट सुपडासाफ
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर हरयाणामध्ये सरकार स्थापन करण्यात ‘किंगमेकर’ची भूमिका बजावलेल्या जननायक जनता पक्षाला (जजपा) पाच वर्षांनंतर राज्यातून नामशेष होण्यामुळे मोठा धक्का बसला आहे. जजपा नेते आणि माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहेत. गेल्या विधानसभेत जजपाने ९० पैकी १० जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत युती केली. मात्र, ही युती खट्टर यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविल्यानंतर तुटली होती.
हरयाणा गेल्या पाच निवडणुकांचा इतिहास काय सांगतो?
पक्ष २०१९ २०१४ २००९ २००५
भाजप ४० ४७ ०४ ०२
काँग्रेस ३१ १५ ४० ६७
जजपा १० ०० ०० ००
लोकदल ०१ १९ ३१ ०९
जनहित काँग्रेस ०० ०२ ०० ००
बसपा ०० ०१ ०१ ०१
शिरोमणी अकाली दल ०० ०१ ०१ ००
अपक्ष ०७ ०५ ०७ १०