आज जाहीर होत असलेल्या हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांमधून धक्कादायक कल समोर येत आहेत. राजकीय विश्लेषक, एक्झिट पोल यांचे अंदाज चुकवत येथील कलांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा काँग्रेसने टप्प्याटप्प्याने पुढे जात मोठी आघाडी घेतली होती. ९० जागा असलेल्या हरयाणा विधानसभेमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये ६० ते ६५ जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर दिसत होते. त्यामुळे काँग्रेसचा विजय निश्चित मानून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. ढोल ताशे वाजू लागले होते. कार्यकर्ते फटाके फोटून एकमेकांना लाडू,जिलेबी भरवत होते. मात्र काही वेळातच मनमोजणीतील आकडे फिरून काँग्रेस मोठ्या फरकाने पिछाडीवर पडली. त्यामुळे जल्लोष आवरता घेण्याची नामुष्की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर ओढवली.
हरयाणा विधानसभेची निवडणूक काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही जोमाने प्रचार केला होता. तर सत्ताधारी भाजपाची स्थिती खराब दिसत असल्याने काँग्रेसला विजय पक्का दिसत होता. त्यात एक्झिट पोलच्या आकड्यांनी काँग्रेसचा उत्साह अधिकच वाढवला होता. त्यामुळे विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसकडून जल्लोषाची जोरदार तयारी करण्यात आली होती. तसेच कल समोर येऊ लागल्याबरोबरत काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयाबाहेर जोरदार उत्साह दिसून येत होता. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते. तसेच ढोल, ताशे वाजवून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला जात होता.
काँग्रेसचे कार्यकर्ते मिठाई वाटत होते. सेल्फी घेतल्या जात होत्या. राहुल गांधींनी उल्लेख केलेली हरयाणाची जिलेबीही आवर्जुन वाटली जात होती. मात्र अनपेक्षितपणे काँग्रेसला सुरुवातीला मिळालेली आघाडी कमी होत गेली आणि काँग्रेसचा आकडा बहुमतासाठी आवश्यक असलेल्या जागांच्या खाली गेला. त्यानंतर हा आकडा वरच आला नाही. उलट भाजपाने बहुमताचा आकडा गाढून पुढे ही आघाडी टिकवली. त्यामुळे बघता बघता काँग्रेसच्या काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरचंही चित्र बदललं. ढोलताशांचा आवाज शांत झाला. मिठाई वाटणंही बंद झालं आणि काही वेळापर्यंत नाचत असलेले कार्यकर्तेही शांत होऊन कार्यालयाबाहेर पडू लागले.