हरयाणा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला अनपेक्षितरीत्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे राज्यात हमखास सत्ता येणार, अशी आशा बाळगून असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. या पराभवानंतर राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार कुमारी शैलजा यांनी या पराभवाचं परखड परीक्षण झालं पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पक्षांतर्गत काहीतरी मोठी चूक झाली, त्यामुळे पक्ष अडचणीत सापडला, असे कुमारी शैलजा यांनी म्हटले आहे. कुमारी शैलजा यांनी मतमोजणी शेवटच्या टप्प्यात असताना प्रतिक्रिया देताना सांगितले की, आम्ही ६० जागा जिंकून येण्याबाबत बाता मारत होतो. मात्र आता आम्हाला संघर्ष करावा लागत आहे, असं दिसत आहे. अंतिम निकाल काय असेल हे पाहावं लागेल. मात्र तो चांगला नसेल, याची मला जाणीव आहे.
हरयाणा विधानसभा निवडणुकीत आमच्याकडून कॅल्क्युलेशनमध्ये चूक झाली आहे. एकीकडे आम्ही ६० जागांवर विजय मिळवण्याची अपेक्षा बाळगत होतो. मात्र आता आम्ही संघर्ष करत आहोत. आम्ही केवळ अपेक्षा बाळगू शकतो. मात्र अंतिम निकालांनंतरच याबाबतच्या कारणांची चर्चा होऊ शकते. एकीकडे आम्ही पूर्णपणे क्लीन स्विप करू इच्छित होतो. मात्र आमच्याकडून काही चूक झाली की भाजपानं काही खेळ केला, हे आपल्याला पाहावं लागेल, असे त्या म्हणाल्या. कुमारी शैलजा यांनी पुढे सांगितले की, मी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच आम्ही काही जागा जिंकल्याही आहेत. मात्र आम्ही संपूर्ण राज्यात का विजय होऊ शकलो नाही, याचा विचार आम्हाला करावा लागेल. याचं व्यापक मूल्यांकन आवश्यक करणं आवश्यक आहे.
दरम्यान, हरयाणा विधानसभा निवडणुकीचे सर्व निकाल जवळपास जाहीर झाले असून, त्यात भाजपाने ४८, काँग्रेसने ३७, आयएनएलडीने २ आणि अपक्षांनी ३ जागा जिंकल्या आहेत.