हरयाणात विधानसभा निवडणुकीतील जुलाना मतदार संघात भारताची माजी कुस्तीपटू विनेश फोगाट हिनं मैदान मारलं. कुस्तीच्या आखाड्यात सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवणारी महिला कुस्तीपटू विनेश फोगाटनं ऑलिम्पिक स्पर्धेनंतर राजकीय आखाड्यात एन्ट्री मारली होती. काँग्रेसच्या तिकिटावर जुलाना मतदार संघात उतरून तिने ऐतिहासिक विजयही नोंदवला. तिचा हा विजय राजकीय आखाड्यात शड्डू ठोकण्याचा तिचा निर्णय सार्थ ठरवणारा आहे.
जुलाना मतदार संघातील जागेसाठी विनेशला टक्कर देण्यासाठी मैदानात उतरली होती WWE रेसलर
जुलाना मतदार संघातील राजकीय दंगल अर्थात विधानसभा निवडणुकीत विनेश फोगाटसमोर भाजप उमेदवार योगेश कुमार याचे चॅलेंज होते. भाजप उमेदवार ६००० हजार मतांनी मागे पडला. पण तुम्हाला माहितीये का? याच जुलाना मतदार संघातून आणखी एक रेसलर निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती.
कोण आहे ती WWE रेसलर? कोणत्या पक्षाकडून लढली निवडणूक?
विनेश फोगाटची प्रतिस्पर्धी असणारी ही रेसल WWE च्या रिंगणात उतरणारी पहिली महिला रेसलर आहे. कविता रानी (कविता दलाल) असं या WWE रेसलरच नाव आहे. चुडीदार घालून WWE च्या रिंगणात उतरुन सर्वांना आश्चर्यचकीत करणारा हा चेहरा आम आदमी पक्षाकडून (AAP) निवडणुकीच्या मैदानात उतरला होता. पण या रेसलरचे डिपॉझिटच जप्त झाले. कारण WWE रेसलरला निवडणुकीच्या रिंगणात फक्त १२८० मतं पडली.
कुणाला किती मतं मिळाली?
विनेश फोगाटला एकूण ६५,०८० इतकी मतं मिळाली. त्यापाठोपाठ भाजप उमेदवार योगेश कुमार यांना ५९,०६५ मत मिळाली. या जागेवर विनेश फोगाटनं ६०१५ मताधिक्याने विजयी ठरली. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवाराला जर १/६ टक्के मतंही मिळाली नाहीत तर संबंधित उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते. जुलाना विधानसभा निवडणुकीत १ लाख ३८ हजार ८७१ इतके मतदान झाले होते. त्यामुळे १/६ किंवा १६.६६ टक्केनुसार, डिपॉझिट सुरक्षित ठेवण्यासाठी किमान २३,१२५ मतं मिळवणं गरजेचे होते. जे WWE रेसलरला जमलं नाही.