Haryana Assembly Election Results 2024 : बाजी हातातून निसटताना भाजपाने केली खेळी; हरयाणात या समिकरणामुळे झाली उलथापालथ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 04:31 PM2024-10-08T16:31:37+5:302024-10-08T16:33:44+5:30
हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला.
हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपा मोठ्या विजयाच्या उंबरठ्यावर आहे. आज मतमोजणीच्या सुरुवातील काँग्रेसने आघाडी घेतली होती. यानंतर काही तासांनी भाजपाने आघाडी घेतली. भाजपा सलग तिसऱ्यांदा सत्तेत येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार काँग्रेसही शर्यतीत कायम आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले होते. यानंतर ९ वाजताच निकालाचा अंदाज बदलायला सुरुवात झाली. यानंतर भाजपने काँग्रेसच्या जागांमधील फरक सातत्याने कमी करण्यास सुरुवात केली. ११ वाजेपर्यंत भाजपने बहुमताचा आकडा गाठला होता.
याआधी भाजपाच्या हातातून हरयाणा राज्य जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अनेक मुद्द्यावर काँग्रेसने भाजपाला कोंडीत पकडले होते. पण तरीही भाजपाने बाजी पलटवली. खरतर यात ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील मतदार महत्वाचा ठरला आहे.
आत्तापर्यंतच्या आलेल्या निकालानुसार, हरयाणातील ३० शहरी जागांपैकी २१ जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर जवळपास ७० टक्के शहरी मतदार भाजपसोबत असल्याचे दिसत आहेत. काँग्रेस फक्त ७ शहरी जागांवर आघाडीवर आहे. ग्रामीण भागात भाजप सध्या २८ जागांवर आघाडीवर आहे, यापूर्वी भाजपकडे १९ जागा होत्या. या निवडणुकीत भाजपाने ग्रामीण भागावर जास्त लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे.
ग्रामीण भागावर जास्त लक्ष
२०१९ मध्ये भाजपने ७० टक्के शहरी जागा जिंकल्या होत्या. २०२४ मध्ये भाजप आता ७३ टक्के शहरी जागांवर आघाडीवर आहे. तर २०१९ मध्ये भाजपने ३२ टक्के जागा ग्रामीण भागातील जिंकल्या होत्या. या निवडणुकीत ग्रामीण भागातील ४५ टक्के जागा भाजपाने जिंकल्या आहेत.