हरयाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येण्यास सुरुवात झाली. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीने आघाडी घेतली असून हरयाणात पुन्हा एकदा भाजपाने आघाडी घेतल्याचे दिसत आहे, यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता निवडणूक आयोगावर काँग्रेसने आरोप केले आहेत. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
जयराम रमेश म्हणाले, लोकसभा निकालांप्रमाणेच हरयाणातील निवडणुकीचे ट्रेंडही मुद्दाम निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर हळू शेअर केले जात आहेत. भाजप प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे का?, असा प्रश्न त्यांनी केला.
हरयाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीच्या ट्रेंडबद्दल काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले,प्रत्यक्षात मोजण्यात आलेल्या फेऱ्यांची संख्या आणि निवडणूक आयोगाच्या डेटाद्वारे टेलिव्हिजनवर दाखवलेल्या फेऱ्यांची संख्या यामध्ये तफावत आहे. निवडणूक आयोगाची आकडेवारी मागे पडली आहे, ११ फेऱ्यांची मोजणी झाली असली तरी ते चौथ्या किंवा पाचव्या फेरीचा डेटा दाखवत आहेत. आमच्या कम्युनिकेशन जनरल सेक्रेटरींनी ट्विट करून निवडणूक आयोगाला विचारले आहे – डेटा दाखवण्यात आणि अपलोड करण्यास उशीर करून ते स्थानिक प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये तुम्हाला प्रत्येक फेरीच्या मोजणीसह थेट डेटा मिळत आहे परंतु हरियाणामध्ये असे नाही, असंही ते म्हणाले.
हरयाणा निवडणुकीच्या निकालानुसार भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार भाजप ५० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस केवळ ३४ जागांवर आघाडीवर आहे.