अंबाला - महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन फंडे आजमावत आहेत. मात्र हरयाणा विधानसभा निवडणुकीत अंबाला येथे एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहेत. अंबाला येथील मतदारांनी आपलं समर्थन दर्शवण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबल्याचं समोर आलं आहे.
हरयाणातील अंबाला येथील एका मुस्लीम वस्तीमधील घरांच्या बाहेर काही पोस्टर्स लावण्यात आले आहेत. 'डोअर बेल खराब आहे, दरवाजा उघडण्यासाठी कृपया मोदी-मोदी आवाज द्यावा' असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. अंबाला छावनी परिसरातील मुस्लीम वस्तीमधील हा प्रकार असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
निवडणूक असल्याने अनेक उमेदवार मतं मागण्यासाठी दरवाजावर येत असतात आणि वारंवार डोअर बेल वाजवत असतात. अशा उमेदवारांनी डोअर बेल वाजवू नये यासाठीच 'डोअर बेल खराब आहे, दरवाजा उघडण्यासाठी कृपया मोदी-मोदी आवाज द्यावा' असे पोस्टर्स घराबाहेर लावण्यात आल्याची माहिती तेथील लोकांनी दिली आहे. तसेच मुस्लीम महिलांनी पुढाकार घेत हे पोस्टर्स लावल्याचं सांगितलं आहे. नरेंद्र मोदींनी तिहेरी तलाक विधेयक संमत केलं आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. अनेक महिलांचं आयुष्य यामुळे उद्ध्वस्त होत होतं. पण आता तसं होणार नाही. त्यामुळेच मोदींना समर्थन देत असल्याचं महिलांनी सांगितलं आहे.
हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या एकूण उमेदवारांपैकी 42 टक्के उमेदवार कोट्यधीश असून, 10 टक्के उमेदवारांवर फौजदारी गुन्हे आहेत. 1138 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यानंतर असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार 481 उमेदवार कोट्यधीश आहेत, तर 117 उमेदवारांवर गुन्हे आहेत. 2014 च्या तुलनेत गुन्ह्यांची नोंद असलेल्या उमेदवारांची संख्या 3 टक्के अधिक आहे. यावेळी हरयाणा विधानसभेची निवडणूक एकूण 74 राजकीय पक्ष लढवीत आहेत. 2014 मध्ये 43 राजकीय पक्षांनी उमेदवार उतरविले होते. हरयाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी येत्या 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत असून, 74 राजकीय पक्षांचे एकूण 1169 उमेदवार नशीब अजमावत आहेत.