कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 01:00 PM2024-09-21T13:00:12+5:302024-09-21T13:01:22+5:30
Haryana Assembly Elections 2024: काँग्रेस खासदार कुमारी सैलजा आणि रणदीप सुरजेवाला हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा सवाल प्रसारमाध्यमांनी मनोहर लाल यांना विचारला.
Haryana Assembly Elections 2024 : करनाल : हरियाणातील विधानसभा निवडणुकीची तारीख जशी जवळ येईल, तसं राजकीय वातावरण तापत असल्याचे दिसून येत आहे. यातच काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांचे काँग्रेस नेत्या कुमारी सैलजा आणि रणदीप सुरजेवाला यांच्याबाबत केलेले विधान समोर आले आहे.
काँग्रेस खासदार कुमारी सैलजा आणि रणदीप सुरजेवाला हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा सवाल प्रसारमाध्यमांनी मनोहर लाल यांना विचारला. त्यावेळी मनोहर लाल म्हणाले की, हे शक्यतांचे जग आहे आणि शक्यता नाकारता येत नाही. योग्य वेळ आल्यावर तुम्हाला सर्व काही समजेल. दुसरीकडे, एका कार्यक्रमात मनोहर लाल हे कुमारी सैलजा यांच्या समर्थनार्थ बोलताना दिसून आले.
काँग्रेसमध्ये वंचित समाजाच्या बहिणीचा अपमान झाल्याचे मनोहर लाल म्हणाले. तसेच, अनुसूचित जाती समाजातील कोणत्याही पक्षाचा असो, अपमान करणे समाजात निषिद्ध आहे आणि त्या वर्गाला शिवीगाळही करण्यात आली आहे, असे मनोहर लाल यांनी सांगितले. याशिवाय, काँग्रेसवर हल्लाबोल करताना कुमारी सैलजा यांना भाजपमध्ये येण्याची ऑफरही मनोहर लाल यांनी दिली.
#WATCH | Karnal: On being asked will Congress MPs Kumari Selja and Randeep Singh Surjewala join the BJP, Union Minister Manohar Lal Khattar says, "It is a world of possibilities and possibilities cannot be ruled out. You will know everything when the right time comes" (20.09) pic.twitter.com/hFS3iV9vu0
— ANI (@ANI) September 21, 2024
दरम्यान, हरियाणा विधानसभेसाठी काँग्रेसकडून तिकीट वाटप आणि निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करताना कुमारी सैलजा आणि रणदीप सुरजेवाला यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील मतभेद अधिकच वाढले आहे. तिकीट वाटपादरम्यान माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या समर्थकांना काँग्रेसमध्ये ७२ तिकिटे मिळाली आहेत, तर कुमारी सेलजा यांना चार विद्यमान आमदारांसह सुमारे १० तिकिटांवर समाधान मानावे लागले आहे.
अशा स्थितीत दोन्ही गटांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांच्या मुलासह त्यांच्या समर्थकांना केवळ दोनच तिकिटे मिळाली आहेत. तर हायकमांडच्या पसंतीनुसार चार ते सहा तिकिटे देण्यात आली आहेत. तिकीट वाटपात हा भेदभाव आणि सन्मान मिळत नसल्याने कुमारी सैलजा नाराज आहेत. दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने बुधवारी नवी दिल्लीत जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी कुमारी सैलजा आणि रणदीप सुरजेवाला हे दोघेही मंचावर दिसले नाहीत.