देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 04:28 PM2024-10-08T16:28:51+5:302024-10-08T16:29:32+5:30

Savitri Jindal Haryana Election Results 2024: हरयाणाच्या हिसार विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांनी १८ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला.

Haryana Assembly Elections 2024: Savitri Jindal Wins In Hisar, Defeats BJP's Kamal Gupta  | देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...

देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...

Savitri Jindal Haryana Election Results 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपनं देशातील सर्वात श्रीमंत महिलेला तिकीट नाकारलं. मात्र, तिनं अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि निवडणुकीत बाजीही मारली. सावित्री जिंदाल या देशातील सर्वात श्रीमंत महिलेचं नाव आहे. हिसारमधून अपक्ष उमेदवार म्हणून सावित्री जिंदाल यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या आहेत. 

सावित्री जिंदाल यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून डॉ. कमल गुप्ता आणि काँग्रेसकडून रामनिवास राणा होते. हरयाणाच्या हिसार विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांनी १८ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. सावित्री जिंदाल यांना हिस्सारमधून एकूण ४९२३१ मते मिळाली. तर काँग्रेसच्या रामनिवास राणा यांना ३०२९० मते मिळाली. याशिवाय, भाजपच्या डॉ.कमल गुप्ता यांना १७३८५ मते मिळाली. तर आम आदमी पक्षाचे उमेदवार संजय सत्रोदिया यांना केवळ २००१ मते मिळाली आहेत.

हरयाणात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. भाजपने अनेक दिग्गजांचा पराभव केला. मात्र सावित्री जिंदाल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना पराभवाची चव चाखायला लावली. सावित्री जिंदाल यांना आधी भाजपकडून निवडणूक लढवायची होती, पण पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही, त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तसेच, यावेळी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. याआधी सावित्री जिंदाल यांनी २००९ साली काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली होती.

देशातील सर्वात श्रीमंत महिला; २.७७ लाख कोटींची संपत्ती
हिसारमधून निवडणूक लढवणाऱ्या सावित्री जिंदाल या देशातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. सावित्री जिंदाल या जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा आणि स्टील किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत ओपी जिंदाल यांच्या पत्नी आहेत. फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार, सावित्री जिंदाल या २.७७ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या मालकीन आहेत. तसेच, त्या भाजप खासदार नवीन जिंदाल यांच्या आई आहेत.

Web Title: Haryana Assembly Elections 2024: Savitri Jindal Wins In Hisar, Defeats BJP's Kamal Gupta 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.