भाजपला भगदाड! एका रात्रीत भूकंप, २० नेत्यांचा पक्षाला रामराम; पहा संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 07:32 PM2024-09-05T19:32:39+5:302024-09-05T19:34:13+5:30
हरियाणात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर झाल्यापासून भाजपला नेत्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले
Haryana BJP : हरियाणात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने बुधवारी ६७ उमेदवारांची यादी जाहीर केली. ही यादी जाहीर होताच हरियाणा भाजपमध्ये मोठा भूकंप झाला. उमेदवारांची यादी जाहीर होताच यादी जाहीर होताच पक्षात विरोध सुरू झाला. रतिया मतदारसंघातील भाजप आमदार लक्ष्मण नापा यांनी भाजपला रामराम केला आहे. त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
हरियाणात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर झाल्यापासून भाजपला नेत्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. अनेक नेत्यांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. काहींनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. ऊर्जा आणि तुरुंग मंत्री रणजित सिंह चौटाला आणि आमदार लक्ष्मण दास नापा यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षाने तिकीट नाकारल्याबद्दल नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. यादी जाहीर झाल्यापासून जवळपास २० भाजप नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
'या' भाजप नेत्यांनी सोडला पक्ष
लक्ष्मण नापा : तिकीट न मिळाल्याने रतियाच्या आमदाराने भाजपचा राजीनामा दिला. सिरसाच्या माजी खासदार सुनीता दुग्गल यांना रतियामधून उमेदवारी देण्यात आली आहे.
करण देव कंबोज: हरियाणा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री उंद्री विधानसभेसाठी तिकीट न मिळाल्याने पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला.
विकास उर्फ बल्ले : दादरी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यांनी भाजपचा राजीनामा दिला.
अमित जैन: भाजप युवा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि सोनीपत विधानसभा निवडणुकीचे प्रभारी यांनी राजीनामा दिला.
समशेर गिल: गिल यांनी उकलाना जागेसाठी उमेदवारी न दिल्याने राजीनामा पाठवला. तर पक्षाने या जागेसाठी माजी मंत्री अनुप धनक यांची निवड केली.
सुखविंदर मंडी : हरियाणा भाजप किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
दर्शन गिरी महाराज : हिसार येथील भाजप नेत्याचाही राजीनामा.
सीमा गैबीपूर : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने सर्व पक्षीय पदांचा राजीनामा दिला आहे.
आदित्य चौटाला: आदित्य चौटाला यांनी एचएसएएम बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. चौटाला यांनी २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
आशु शेरा : पानिपतमधील भाजप महिला शाखेच्या जिल्हाध्यक्षाचा राजीनामा दिला. तिकीट रद्द झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सविता जिंदाल : भाजपचा राजीनामा देऊन हिसारमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
तरुण जैन : हिसारमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.
नवीन गोयल: गुडगावमध्ये भाजपचा राजीनामा दिला.
डॉ.सतीश खोला : खोला यांनी रेवाडीतून तिकिटाची मागणी केली होती. त्यानंतर पक्षाचा राजीनामा दिला.
इंदू वालेचा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक संजीव वलेचा यांच्या पत्नी इंदू वालेचा यांनीही पक्ष सोडला, त्यांच्या पतीनेही भाजप सोडला.
बच्चनसिंग आर्य : माजी मंत्री आर्य यांनी भाजपला सोडले.
रणजीत चौटाला : मंत्रीपदाचा राजीनामा देऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
बिशंबर वाल्मिकी : माजी मंत्री भाजपचा राजीनामा.
पंडित जीएल शर्माः भाजपचा राजीनामा देऊन दुष्यंत चौटाला यांच्या घरी गेले. ८ सप्टेंबरला ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.
प्रशांत सनी यादव : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. रेवाडीतून तिकिटाची मागणी केली होती, मात्र तिकीट न मिळाल्याने राजीनामा दिला. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.