चंदीगड: हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. आदमपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली टिकटॉक स्टार सोनाली फोगाट हिला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कुलदीप बिश्नोई यांनी मोठा फरकाने विजय मिळवला आहे.
आदमपूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई यांच्या बालेकिल्ला असल्याचे बोलले जाते. असे असतानाही भाजपाने त्यांच्याविरोधात टिकटॉक स्टार सोनाली फोगाट हिला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. तरी सुद्धा कुलदीप बिश्नोई यांचा विजय झाला आहे. आतापर्यंत 12 वेळा बिश्नोई कुटुंबियातील सदस्य विजय झाला आहे. तर आदमपूर विधानसभा मतदारसंघातून कुलदीप बिश्नोई चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
विशेष म्हणजे, सोनालीचा पती संजय फोगाट हे भाजपाचे नेते होते. पतीच्या निधनानंतर सोनालीने भाजपात प्रवेश केला होता. भाजपाने सोनालीला पक्षाचे प्रदेश महिला मोर्चाचे उपाध्यक्ष बनवले होते. हरयाणामधील हिसार जिल्ह्यातील संतनगरमध्ये राहणारी सोनाली फोगाट आपल्या टिकटॉक व्हिडिओमुळे जास्त चर्चेत होती. सोनाली फोगाटचे टिकटॉकवर अनेक फॉलोअर्स आहेत. सोनालीने चित्रपट आणि टीव्ही शोमध्येही काम केलेले आहे. टिकटॉकवर सोनाली खूपच लोकप्रिय आहे. तिच्या एका-एका व्हिडिओला दिवसभरात 50 हजारहून अधिक व्ह्यूज मिळतात.