चंदीगड: हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. भाजपाने सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाने अनेक नवखे उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. यात खेळाडूंचा मोठा सहभाग होता. मात्र, या निवडणुकीत काही नवख्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
दादरी विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बबिता फोगाट यांना धक्का बसला आहे. बबिता फोगाट यांचा जननायक जनता पार्टीचे सतपाल सांगवान यांनी पराभव केला आहे. तर कुस्तीपटू योगेश्वर दत्ता यांचाही पराभव झाला आहे. बरौदा मतदारसंघातून योगेश्वर दत्त यांच्यावर मात करत काँग्रेसचे उमेदवार श्रीकृष्ण हुड्डा यांनी विजय मिळवला आहे. याशिवाय, लतिका शर्मा यांचाही पराभव झाला आहे. कालका मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदीप चौधरी यांनी लतिका शर्मा यांच्यावर मात केली आहे. विशेष म्हणजे, 2014च्या विधानसभा निवडणुकीत लतिका शर्मा यांचा विजय झाला होता.
दुसरीकडे, भाजपाच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले माजी हॉकीपटू संदीप सिंग यांचा विजय झाला आहे. त्यांनी कुरुक्षेत्र जिल्ह्यातील पेहोवा मतदासंघातून काँग्रेसचे मनदीप सिंह चट्टा यांचा 5314 मतांनी पराभव केला आहे. याशिवाय, पंचकुला मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात असलेले भाजपाचे ज्ञानचंद गुप्ता विजयी झाले आहे. त्यांनी काँग्रेसच्या चंद्रमोहन यांचा पराभव केला आहे.
दरम्यान, हरियाणा विधानसभेत एकूण 90 जागा आहेत, तर बहुमतासाठी 46 जागांची आवश्यकता आहे. पण, भाजपाला 40 जागा मिळल्या आहेत. तर काँग्रेसला 30 आणि जेजेपी 10 जागा मिळविल्या आहेत. त्यामुळे येथील परिस्थिती त्रिशंकू असल्याचे पाहायला मिळते.