संजीव साबडे, मुंबई‘मुंबई मेक इन इंडिया’च्या निमित्ताने मुंबईत आलेले हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी रविवारी विविध उद्योगसमूहांशी २0 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. खट्टर यांनी ‘मेक इन इंडिया’ प्रदर्शनात वांद्रे-कुर्ला संकुलात असलेल्या हरियाणाच्या दालनाला भेट देऊन तेथेही अनेक गुंतवणूकदारांशी चर्चा केली. महाराष्ट्र वा गुजरात यांच्याशी आमची स्पर्धा नाही. पण हरियाणात अधिकाधिक गुंतवणूक व्हावी, असा आपला प्रयत्न असून, वर्षभरात अडीच लाख कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य असल्याचे मुख्यमंत्री खट्टर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.खट्टर म्हणाले की, आतापर्यंत दीड लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असून, त्यापैकी २0 हजार कोटींचे सामंजस्य करार रविवारी करण्यात आले. सामंजस्य करार झाले म्हणजे तेवढी गुंतवणूक येतेच, असे नाही. पण करार केलेल्यांपैकी अधिकाधिक गुंतवणूक हरियाणात यावी, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर आणि कोलकाता-अमृतसर कॉरिडॉरचा खूप भाग हरियाणातून जातो. त्याचा फायदा आम्हाला मिळेल. हरियाणा हे राज्य दिल्लीला लागून आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो रेल्वे, उत्तम रस्ते या सुविधा आमच्याकडे असल्याने गुंतवणूकदार हरियाणामध्ये येण्यास उत्सुक आहेत. आम्ही मागास भागात येणाऱ्या उद्योगांना तसेच लहान आणि मध्यम उद्योगांना वीज दरात सवलतही देत आहोत. दिल्लीच्या जवळ असल्याने येथील जमिनीचे भाव अधिक असले तरी राज्यात असलेल्या पायाभूत सुविधा गुंतवणूकदारांना आकर्षित करणाऱ्या आहेत, असे खट्टर म्हणाले.गुरगावला ग्लोबल सिटी करण्याची आमची योजना यशस्वी होईल, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की एक हजार एकर जमिनीवर उभी राहणारी ही ग्लोबल सिटी देशातील अन्य कोणत्याही ग्लोबल सिटीपेक्षा निश्चितच मोठी असेल. तिथे फायनान्शियल डिस्ट्रिक्ट उभे राहावे, असा आमचा प्रयत्न आहे. गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटीसाठी आम्ही केंद्राकडे गेलो नसलो तरी गुजरातने ते केल्यास आम्हीही त्यांचे अनुकरण करू. हरियाणामध्ये संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात मोठी गुंतवणूक होण्यास वाव आहे, असेही त्यांनी सांगितले.
गुंतवणुकीसाठी हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर मुंबईत
By admin | Published: February 15, 2016 3:36 AM