जम्मू काश्मीरमध्ये उमेदवार यादीला प्रचंड विरोध झालेला असताना भाजपाने हरियाणामध्ये पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये काही महिन्यांपूर्वीच नेतृत्व बदल होऊन मुख्यमंत्री झालेले नायब सिंह सैनी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. ६७ जणांची पहिली यादी जाहीर झाली आहे.
महत्वाचे म्हणजे मंत्रिपद नाकारणाऱ्या अनिल विज यांनाही अंबाला मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. तर सैनी यांना लाडवा व अरविंद शर्मा यांना गुहाना जागेवर तिकीट मिळाले आहे. हरियाणामध्ये एकूण ९० जागा आहेत. या ठिकाणी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे.
२०१९ मध्ये भाजपाने जननायक जनता पार्टीसोबत मिळून निवडणूक लढविली होती. यंदा जेजेपीने वेगळी चूल मांडली आहे. आज त्यांनी १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार भाजपाकडे ४०, काँग्रेस ३१ अन्यकडे १९ जागा आहेत.
सैनींचा मतदारसंघ बदलला...सैनी हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी कर्नाल लोकसभा मतदार संघातून खासदार होते. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना पदाचा राजीनामा द्यायला लावला होता. कर्नाल विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते. पोटनिवडणुकीत सैनी कर्नालमधून आमदार झाले. परंतू, यावेळी भाजपाने सैनींना कर्नालऐवजी लाडवामधून तिकीट दिले आहे. यामुळे आता कर्नालमध्ये कोणाला तिकीट देणार याकडे लक्ष लागले आहे.