रोहतक : हरयाणातील रोहतक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृद्ध नागरिकांना मृत घोषित करून त्यांना वृद्धापकाळात मिळणारी पेन्शन बंद करण्यात आल्याचे समोर आले. हे प्रकरण प्रसार माध्यमांद्वारे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी अधिकाऱ्यांना अशा सर्व वृद्ध नागरिकांना पुन्हा पेन्शन देण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर रोहतक येथे पोहोचले. यावेळी त्यांनी लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या.
यादरम्यान वृद्धांनी सांगितले की, त्यांचे नाव वृद्धापकाळ पेन्शनच्या लाभार्थ्यांच्या यादीतून काढून टाकण्यात आले आहे. मुख्यमंत्री समस्या ऐकत असताना एका वृद्ध महिलेने आपली व्यथा सांगितली. यावर मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या खिशातून 2500 रुपये काढून वृद्ध महिलेला दिले. तसेच, पैसे देताना मुख्यमंत्र्यांनी त्या वृद्ध महिलेला सांगितले की, 'या महिन्याची ही पेन्शन घ्या आणि पुढच्या महिन्यापासून घरी येईल.'
याचबरोबर, पुढे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 70 जणांची पेन्शन बहाल करण्यात आली असून आज संध्याकाळपर्यंत उर्वरितांची पेन्शन बहाल केली जाईल. यादरम्यान मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी अधिकाऱ्यांना आज संध्याकाळपर्यंत सर्वांची पेन्शन सुरू करावी, असे सांगितले आहे. नुकतेच एका 102 वर्षीय वृद्धाने पेन्शन बंद केल्याच्या निषेधार्थ मिरवणूक काढली होती. घोड्यांनी सजवलेल्या रथावर स्वार होऊन मिरवणूक काढलेल्या वृद्धाने पोस्टरवर लिहिले होते की, 'तुमचे काका अजूनही जिवंत आहेत.' हे प्रकरण खूप गाजले होते.
तक्रारीचे जागेवरच निराकरणमुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात 101 तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीचे जागेवरच निराकरण करण्यात आले. तक्रारींमध्ये बहुतांशी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाची प्रकरणे समोर आली आहेत. तसेच, यावेळी पंच सरपंचांच्या मानधनात घोटाळा केल्याचा आरोप झाल्याने मुख्यमंत्र्यांनी लखन माजरा ब्लॉकच्या ग्रामसचिवाला जागेवरच निलंबित करण्याचे आदेश दिले. दरम्यान, खासदार अरविंद शर्मा यांचे समर्थक वकील आझाद अत्री यांनीही गौड संस्थेच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना लेखी तक्रार देण्यास सांगितल्यावर ते नाराज झाले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे बराच वेळ गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले.