नवी दिल्ली - गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. याच दरम्यान हरियाणा (Haryana) चे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांना सणसणीत टोला लगावला आहे. "राकेश टिकैत हे फ्रस्ट्रेटेड नेते" असल्याचं खट्टर यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला हवा असं देखील म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.
मनोहर लाल खट्टर यांनी राकेश टिकैत यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदींनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला हवा मात्र काही काही नेते फस्ट्रेटेड आहेत. त्या नेत्यांची इच्छा काहीतरी वेगळीच असल्याने ते शेतकऱ्यांच्या हिताबद्दल बोलत नाहीत असा आरोप खट्टर यांनी केला आहे. तसेच राकेश टिकैत यांना जर शेतकऱ्यांना समजवायचं असेल तर त्यांनी उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला देखील आवर्जून दिला आहे. यासोबतच हरियाणामधील शेतकरी समाधानी असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
काही लोकांचा गैरसमज झाला असून आम्ही लवकरच त्यांना यासंदर्भात माहिती देऊन त्यांचा विरोध शांत करू. हरियाणामधील शेतकऱ्यांसमोर कोणत्याही अडचणी नाही. काही नेते स्वार्थी असून ते स्वत:च्या हितासाठी शेतकऱ्यांना पुढे करत आहेत. गुरनाम सिंह चढुनी असो किंवा राकेश टिकैत असो दोघेही आपल्या खासगी स्वार्थीसाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत असा आरोपही मनोहर लाल खट्टर यांनी केला आहे. दिल्लीमध्ये 26 जानेवारी रोजी झालेल्या हिंसेसंदर्भात बोलताना खट्टर यांनी दिल्ली पोलिसांनी ज्या लोकांविरोधात एफआयआर दाखल केली आहे त्यापैकी काहींना अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"राकेश टिकैत हे 2000 रुपयांसाठी कुठेही जायला तयार होतात", भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान
गाझियाबादचे भाजपा आमदार नंद किशोर गुर्जर यांनी शेतकरी आंदोलनाचं नेतृत्त्व करणारे नेते राकेश टिकैत यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. "राकेश टिकैत हे फक्त दोन हजार रुपयांसाठी कुठेही जायला तयार होतात" असं गुर्जर यांनी म्हटलं आहे. राकेश टिकैत यांनी आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गाझीपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप केला आहे. गुर्जर यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. "मी टिकैत कुटुंबाचा आदर करतो. मात्र लोकं असं म्हणतात की, राकेश टिकैत हे दोन हजार रुपयांसाठी कुठेही जायला तयार होतात. असं असल्यास ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट असून त्यांनी असं करू नये" असं नंद किशोर गुर्जर यांनी म्हटलं आहे.
"देशात 'टिकैत फॉर्मूला' लागू करून 3 क्विंटल गव्हाची किंमत 1 तोळा सोन्याएवढी करा"
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी किमान आधारभूत किंमत अर्थात MSP बाबत एक मोठं विधान केलं आहे. राकेश टिकैत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना गव्हाची किंमत थेट सोन्याच्या किमतीशी जोडली आहे. ज्याप्रमाणे सोन्याची किंमत वाढत आहे त्यानुसार गव्हाची किंमत देखील वाढली पाहिजे असं टिकैत यांनी म्हटलं आहे. तसेच 3 क्विंटल (300 किलो) गव्हाची किंमत ही 1 तोळा सोन्याएवढी करायला हवी असंही म्हटलं आहे. यासोबतच देशात "टिकैत फॉर्मूला" लागू करा असं सांगितलं आहे. 26 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर सिंघू बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनाचं केंद्र आता गाझीपूर बॉर्डर बनलं आहे. तेव्हापासून या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व राकेश टिकैत यांच्याकडे आलं आहे. अशावेळी टिकैत यांनी MSP बाबत केलेल्या विधानाला अधिक महत्व प्राप्त झालं आहे.