नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून रुग्णांचा आकडा 2,40,46,809 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,43,144 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,000 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,62,317 लोकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहे. याच दरम्यान हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manoharlal Khattar) यांनी आंदोलकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली सीमेजवळची हरियाणामधील काही गावं कोरोना हॉटस्पॉट झाल्याचा गंभीर आरोप खट्टर यांनी केला आहे. तसेच खट्टर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण शेतकऱ्यांना आंदोलन स्थगित करण्याचा सल्ला दिल्याचा उल्लेख देखील केला आहे. "मी शेतकरी नेत्यांना महिन्याभरापूर्वी आवाहन केलं होतं की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन मागे घ्या. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा आंदोलन करता येईल, असं मी म्हटलं होतं. मात्र आता या आंदोलनामुळे काही गावं की कोरोनाचा हॉस्पॉट झाली आहेत. येथील काही गावकरी या आंदोलनाच्या ठिकाणी सतत ये-जा करत असल्याने हे घडलं आहे" असं खट्टर यांनी म्हटलं आहे.
मनोहरलाल खट्टर यांनी राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत असल्याचेही म्हटलं आहे. "राज्यात मागील तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. एक लाख सात हजार सक्रिय रुग्ण राज्यात आहेत. राज्यातील आरोग्य व्यवस्था सध्या जेवढी गरज आहे त्यासाठी पुरेशी आहे" असं खट्टर म्हटलं आहे. देशात कोरोनाने थैमान घातले आहेत. दररोज तीन लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.
"लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदीच जबाबदार, ते लोकांशी खोटं बोलताहेत"
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र याच दरम्यान अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा असलेला पाहायला मिळत आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जबाबदार धरलं आहे. तसेच मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारने कोविशिल्ड लशीच्या दोन्ही डोसमधील कालावधी वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावर ओवेसी यांनी निशाणा साधला आहे. "लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदीच जबाबदार, ते लोकांशी खोटं बोलताहेत" असं म्हटलं आहे. तसेच हा धोरण लकवा (पॉलिसी पॅरालिसिस) असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला आहे. "जोपर्यंत आपण भारतातील लोकांचं लसीकरण पूर्ण करत नाही, तोपर्यंत लोकांचे जीव वाचवू शकत नाही, असं सर्वच तज्ज्ञ सांगत आहेत. हे करायचं असेल तर मोदी सरकारला हे निश्चित करावं लागेल की, प्रत्येक महिन्याला 300 मिलियन डोस दिले जातील आणि लोकांचं लसीकरण केलं जाईल. पण ते यात अपयशी ठरले आहेत" असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.