काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 05:34 PM2024-09-27T17:34:26+5:302024-09-27T17:34:48+5:30
Haryana Assembly Elections 2024 : निवडणुकीदरम्यान काँग्रेसने आपल्या १३ बंडखोर नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
Haryana Assembly Elections 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीदरम्यान काँग्रेसने आपल्या १३ बंडखोर नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. हे सर्व नेते पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवत आहेत. ज्या नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यात जिंदमधील प्रदीप गिल आणि कलायतमधील अनिता धुल्ल यांची नावे प्रमुख आहेत.
हरियाणामधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदयभान यांनी जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, निलंबित करण्यात आलेले सर्व नेते पक्षाच्या विरोधात काम करत आहेत, त्यामुळे या सर्वांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे. पत्रात म्हटले आहे की, या नेत्यांची तक्रार आली होती. त्यानुसार ती योग्य असल्याचे दिसून आले. त्यामुळे या सर्वांची पक्षातून हकालपट्टी केली जात आहे.
अंबाला कँटमधून अधिकृत उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवणाऱ्या चित्रा सरवरा यांना काँग्रेसने अलीकडेच निलंबित केले होते. चित्रा यांच्या निलंबनाचा आदेश काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केला होता. दरम्यान, काँग्रेस आधी बंडखोर नेत्यांची समजूत काढत आहे. मात्र, जे बंडखोर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
कोण-कोणत्या नेत्यांवर कारवाई?
हरियाणा काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, गुहियामधून नरेश धांडे, जिंदमधून प्रदीप गिल, पुंडरीमधून सजन्न ढुल आणि सुनीता बॅट्टन, निलोखेरीमधून राजीव गोंडर आणि दयाल सिरोही, पानिपत ग्रामीणमधून विजय जैन, उचाना कलांमधून दिलबाग, दादरीमधून अजित फोगाट, भिवानीमधून अभिजीत सिंह, भवानी-खेरामधून सतबीर रतेला, पृथलामधून नीतू मान आणि कलायतमधून अनिता धुल हे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध लढत आहेत.