नवी दिल्ली - गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक बैठका झाल्या असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान शेतकरी आंदोलनाबाबत काही नेत्यांनी वादग्रस्त विधान केली आहेत. अशीच एक घटना पुन्हा एकदा घडली आहे. हरियाणाच्या कृषी मंत्र्यांनंतर आता काँग्रेसच्या महिला नेत्या विद्या देवी (Vidya Devi) यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. "पैसे द्या किंवा दारू वाटा पण शेतकरी आंदोलन सुरू ठेवा" असं विद्या देवी यांनी म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत बोलताना विद्या देवा यांनी शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांची मदत करा, पैसे वाटून किंवा दारू वाटून असं विद्या यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांबाबत बोलताना महिला नेत्याची जेव्हा जीभ घसरली तेव्हा काँग्रेसचे आमदार सुभाष गंगोली यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. विद्या देवी जींदच्या नरवानामधून काँग्रेसकडून विधानसभेसाठी उभा होत्या. विद्या देवी यांनी काँग्रेस जेव्हापासून निवडणूक हारलं आहे, तेव्हापासून पक्षाचं अस्तित्व संपलं आहे. आता हे आंदोलन कसंतरी उभं राहिलं असून आपल्याला प्रत्येक परिस्थितीत ते पुढे घेऊन जायचं असल्याचं म्हटलं आहे.
"शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांची मदत करा, मग ती पैशाच्या बाबतीत असो किंवा दारू. या शेतकऱ्यांसाठी दारूही दान करू शकता. जितकं शक्य होईल तितकं सहकार्य करून हे आंदोलन पुढे घेऊन जा" असं विद्या देवी यांनी म्हटलं आहे. हरियाणाचे कृषीमंत्री जेपी दलाल (JP Dalal) यांनी देखील शेतकरी आंदोलनाबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांबद्दल बोलताना त्यांनी हे घरी असते तरीही त्यांचा मृत्यू झालाच असता. जे आज घरी आहेत त्यांचा मृत्यू होत नाही का? कोणी हृदयविकाराने तर कोणी आजारामुळे मरण पावतं असं देखील म्हटलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"देशभरात मार्च काढणार अन् गुजरात केंद्राच्या नियंत्रणातून मुक्त करणार"
शेतकरी आंदोलनातील नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी एक मोठी घोषणा केली. राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच थेट केंद्र सरकारलाच आव्हान दिलं आहे. "देशभरात मार्च काढणार आणि गुजरात केंद्राच्या नियंत्रणातून मुक्त करणार" असं म्हणत राकेश टिकैत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने हरियाणाच्या बहादूरगडमध्ये किसान महापंचायत आयोजित करण्यात आली होती. यात देशभरात मार्च काढण्याची मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली. गुजरातला मुक्त करू. कारण गुजरात हे केंद्राच्या नियंत्रणाखाली आहे. भारत स्वतंत्र आहे. पण गुजरातमधील जनता ही कैदेत आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना तुरूंगात टाकलं जात आहे असा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे. तसेच त्यांनी गुजरातमध्ये जाण्याची तारीख अजून निश्चित करण्यात आली नसल्याचं देखील म्हटलं आहे. या आंदोलनाचं राजकारण करून नका असंही टिकैत यांनी म्हटलं आहे.
"राकेश टिकैत हे 2000 रुपयांसाठी कुठेही जायला तयार होतात", भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान
गाझियाबादचे भाजपा आमदार नंद किशोर गुर्जर यांनी शेतकरी आंदोलनाचं नेतृत्त्व करणारे नेते राकेश टिकैत यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. "राकेश टिकैत हे फक्त दोन हजार रुपयांसाठी कुठेही जायला तयार होतात" असं गुर्जर यांनी म्हटलं आहे. राकेश टिकैत यांनी आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गाझीपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप केला आहे. गुर्जर यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. "मी टिकैत कुटुंबाचा आदर करतो. मात्र लोकं असं म्हणतात की, राकेश टिकैत हे दोन हजार रुपयांसाठी कुठेही जायला तयार होतात. असं असल्यास ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट असून त्यांनी असं करू नये" असं नंद किशोर गुर्जर यांनी म्हटलं आहे.