haryana election 2019 : हरयाणाची त्रिशंकू विधानसभेकडे वाटचाल, भाजपाला जबरदस्त धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 12:04 PM2019-10-24T12:04:03+5:302019-10-24T12:48:16+5:30
हरयाणामध्ये भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे कल हाती येऊ लागले आहेत.
चंदिगड - हरयाणामध्येभाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे कल हाती येऊ लागले आहेत. हरयाणातील ९० जागांपैकी सर्व जागांचे कल आता हाती आले आहे. या कलांमधून हरयाणामध्ये त्रिशंकू विधानसभेचे चित्र दिसत आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपा ४१ तर काँग्रेस २९ जागांवर आघाडीवर आहे. राज्यात जननायक जनता पार्टी किंगमेकर ठरण्याच्या मार्गावर आहे. जननायक जनता पक्षाला १२ जागांवर आघाडी आहे. तर इतर आठ ठिकाणी आघाडीवर आहे.
हरयाणा सरकारमधील भाजपाचे अनेक मंत्री पराभवाच्या छायेत आहेत. तसेच बहुमतासाठी आवश्यक असलेला ४६ जागांचा आकडा गाठणेही भाजपाला अवघड होताना दिसत आहे. त्यामुळे हरयाणात सरकार स्थापनेमध्ये जननायक जनता पार्टी आणि इतर पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
हरयाणा विधानसभेमध्ये एकूण ९० जागा असून, येथे भाजपा, काँग्रेस, जेजेपी आणि इंडियन नॅशनल लोकदल यांच्यात चुरस आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत हरयाणामध्ये भाजपाने संपूर्ण बहुमत मिळवले होते.
यावेळी हरयाणामध्ये विस्कळीत विरोधी पक्षाचा लाभ घेऊन भाजपा जोरदार मुसंडी मारेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने भाजपाला जोरदार टक्कर दिली आहे.