Haryana election 2024: हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे. त्यानंतर ५ तारखेला मतदान होणार आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच भाजपला मोठा झटका बसला आहे. अलीकडेच भाजपच्या तिकिटावर खासदारकीची निवडणूक लढवलेले अशोक तंवर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रॅलीत अशोक तंवर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी अशोक तंवर यांना काँग्रेसमध्ये सामील करून घेतले आहे. विशेष म्हणजे अशोक तंवर यांनी आज दुपारी १.४५ वाजता भाजप उमेदवाराच्या रॅलीत सहभाग घेतला होता आणि त्यांनी याबाबत ट्विटही केले होते. यानंतर अशोक तंवर काँग्रेसच्या कार्यक्रमात दिसले. आता अशोक तंवर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, अशोक तंवर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहिती काँग्रेसने सोशल मीडियावर दिली आहे. काँग्रेसने शोषित आणि वंचितांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवला असून संविधानाच्या रक्षणासाठी पूर्ण प्रामाणिकपणे लढा दिला आहे. आमच्या संघर्षाने आणि समर्पणाने प्रभावित होऊन आज भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार, हरियाणामधील भाजपच्या प्रचार समितीचे सदस्य आणि स्टार प्रचारक अशोक तंवर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस परिवारात पुन्हा स्वागत आहे, भविष्यासाठी शुभेच्छा, असे काँग्रेसने म्हटले आहे.
कोण आहेत अशोक तंवर?अशोक तंवर यांचा काँग्रेसशी दीर्घकाळ संबंध आहे. १९९९ मध्ये ते NSUI चे सचिव होते आणि २००३ मध्ये ते अध्यक्ष झाले. २००९ मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर सिरसा लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. यानंतर अशोक तंवर हे २०१४ ते २०१९ पर्यंत हरियाणा काँग्रेसचे अध्यक्षही होते. मात्र २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली. काँग्रेसनंतर अशोक तंवर यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक तंवर यांनी २०१४ मध्ये सिरसा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती, परंतु काँग्रेसच्या कुमारी शैलजा यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.