हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 07:42 PM2024-10-08T19:42:50+5:302024-10-08T19:46:39+5:30
Nayab Singh Saini Net worth, Haryana Election 2024: नायबसिंग सैनी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असून ६ महिन्यांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले
Nayab Singh Saini Net worth, Haryana Election 2024: हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. राज्यात भाजपा पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल हे जवळपास निश्चित आहे. नायबसिंग सैनी यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या या निवडणुकीत भाजपाने अप्रतिम कामगिरी केली. निवडणुकीच्या सहा महिने आधी भाजपने हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदावरून मनोहर लाल खट्टर यांना हटवून नायब सिंह सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची कमान सोपवली होती. जातीय समीकरणानुसार हा निर्णय भाजपसाठी अगदी योग्य ठरल्याचे दिसले आणि हरयाणामध्ये भाजपला मोठे यश मिळाले. अवघ्या ६ महिन्यात ते हरयाणाचा हिरो बनले. जनतेच्या मनात प्रस्थापितांविरोधात असलेला रोष (Anti incumbency) झटकून टाकण्यात त्यांना यश आले. हरयाणातील भाजप विरूद्ध काँग्रेस सामन्यात मुख्यमंत्री नायब सैनी 'मॅन ऑफ द मॅच' ठरले. जाणून घेऊया त्यांच्याकडील संपत्ती किती?
नायबसिंग सैनी यांची नेटवर्थ
नायबसिंग सैनी हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. त्यांची संपत्ती कोट्यवधींची असून, त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात याची माहिती दिली होती. त्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती (Nayab Singh Saini Net worth) ५,८०,५२,७१४ रुपये आहे, तर त्यांच्यावर ७४,८२,६१९ रुपये कर्ज आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती ३,५७,८५,६२१ रुपये होती आणि त्यांच्यावर ५७,३४,८७८ रुपयांचे कर्ज होते.
बँक खात्यात इतकी रक्कम जमा
MyNeta.info वर शेअर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या मालमत्तेचा तपशील देताना विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडे १.७५ लाख रुपयांची रोकड असल्याचे सांगितले होते. त्यांच्या पत्नीकडे १.४० लाख रुपयांची रोकड होती. तसेच त्यांची पत्नी आणि मुलांच्या विविध बँकांमध्ये उघडलेल्या खात्यांमध्ये ३६ लाखांहून अधिक रक्कम जमा होती. गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी त्यांच्या किंवा त्यांच्या पत्नीच्या नावे शेअर्स किंवा बाँड्समध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही.
PPF-LIC मध्ये गुंतवणूक केली
त्यांचे पीपीएफ खाते आहे, ज्यामध्ये ८,८५,५९२ रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या नावावर २ लाख रुपयांची LIC पॉलिसीही सुरू आहे. दागिन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, नायब सिंग सैनी यांच्याकडे ३० ग्रॅम सोने (किंमत सुमारे २ लाख रुपये), त्यांच्या पत्नीकडे १०० ग्रॅम सोने (सुमारे ६.४० लाख रुपये) आणि मुलांच्या मालकीच्या दागिन्यांची किंमत सुमारे ३ लाख रुपये आहे.
वाहने आणि स्थावर मालमत्ता
वाहनांबाबत सांगायचे झाल्यास निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, नायबसिंग सैनी यांच्या नावावर तीन वाहने आहेत, यामध्ये दोन टोयोटा इनोव्हा आणि एक क्वालिस कारचा समावेश आहे. त्यांची एकूण किंमत सुमारे २० लाख रुपये आहे. त्यांच्या नावावर सुमारे ६५ लाख रुपयांची शेतजमीन आहे, तर त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या निवासी इमारतींची एकूण किंमत ४.२० कोटी रुपये आहे.