CM Nayab Singh Saini, PM Modi, Haryana Election 2024: राजकीय अभ्यासक आणि निवडणूकपूर्व मतांचे कल या साऱ्याचा अंदाज चुकवत भाजपाने तिसऱ्यांदा हरयाणात विजय संपादन केला. सुरूवातीला जोरदार उसळी मारणाऱ्या काँग्रेसला अवघ्या दोनच तासात भाजपाने पिछाडीवर सोडले आणि मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर भाजपाने यशस्वी घोडदौड केल्याचे दिसले. हरयाणात सध्याच्या स्थितीनुसार, अंतिम निकालात भाजपा ९० पैकी ५०च्या जवळपास जागा जिंकेल असे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. भाजपाचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. पण अखेर हरयाणात भाजपाने दमदार कामगिरी केली. या विजयाचे सगळे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच जाते, अशा भावना राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी व्यक्त केल्या.
"मी लाडवा आणि हरयाणाच्या २ कोटी ८० लाख लोकांचे आभार व्यक्त करतो. हरयाणातील या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जाते. हा विजय म्हणजे एका अर्थाने मोदीजींनी राबवलेल्या विविध योजनांवर शिक्कामोर्तबच आहे. मी राज्यपाल महोदयांकडून प्रमाणपत्र घेईन आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या ज्योतिसर मंदिरात जाऊन दर्शन घेईन. हरयाणाच्या लोकांनी पुन्हा एकदा भाजपावर विश्वास दाखवला आहे. आम्ही यापुढेही मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुढील वाटचाल करू. तिसऱ्यांदा हरयाणाच्या जनतेने भाजपाची निवड केली आहे. पंतप्रधान मोदींच्यामुळेच हे शक्य झाले. मोदीजींना मला फोन केला आणि मला शुभाशीर्वाद दिले. माझ्या राज्यातील गोरगरीब जनता, शेतकरी बांधव आणि युवा वर्ग असाच माझ्या पाठिशी कायम उभा राहिल याची मला खात्री आहे," असे हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी म्हणाले.
दरम्यान, भाजपाने हरयाणात विजय मिळवला असला तरीही त्यांच्या पाच मंत्र्यांचा पराभव झाला. माजी विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता, रणजीत चौटाला यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. नूँह विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे माजी मंत्री संजय सिंह पराभूत झाले. या मतदारसंघातून आफताब अहमद विजयी झाले. जगाधरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले भाजपाचे मंत्री कंवरपाल गुर्जर यांचाही पराभव झाला आहे. काँग्रेसचे अकरम खान यांनी त्यांचा पराभव केला. हिसार विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार आणि माजी आरोग्य मंत्री डॉ. कमल गुप्ता यांचाही पराभव झाला. देशातील सर्वात श्रीमंत महिला असलेल्या सावित्री जिंदाल यांनी त्यांचा पराभव केला. भाजपाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्याचसोबत रानिया विधानसभा मतदारसंघात रंजित चौटाला यांचा, तर थानेसर विधानसभा मतदारसंघातून सुभाष सुधा या मंत्र्यांचाही पराभव झाला.