Priyanka Chaturvedi on Congress Loss, Haryana Election: हरयाणाच्या निवडणुकीच्या निकालाने सर्वांनाच चकित केले आहे. सर्व एक्झिट पोल आणि राजकीय पंडित सांगत होते की, हरयाणात काँग्रेसच्या बाजूने एकतर्फी वातावरण आहे आणि भाजप विजयाची हॅटट्रिक करण्यापासून दूर आहे. ८ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली, तेव्हा पहिल्या तासात काँग्रेस ६५ जागांवर आघाडी घेऊन दणदणीत विजयाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत होते. त्यानंतर दिल्ली काँग्रेसच्या मुख्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद साजराही केला. पण १० वाजेपासून ट्रेंड बदलला आणि भाजपने काँग्रेसवर आघाडी घेतली. हरयाणामध्ये भाजपाने जबरदस्त 'कमबॅक' केलेच, पण त्यासोबतच विजयाच्या हॅट्ट्रिकच्या दिशेनेही वाटचाल करत आहे हे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेसवर खोचक शब्दांत टीका केली आणि भाजपाचे अभिनंदन केले.
काँग्रेस कमकुवत; रणनीती तपासून पाहण्याची गरज
"एवढ्या अँटी इन्कम्बन्सीच्या वातावरणानंतरही भाजपा सरकार स्थापन करत असेल तर मी त्याचे अभिनंदन करू इच्छिते. त्यांनी आपला प्रचार चांगल्या प्रकारे वागवला आणि हरयाणातील लोकांचा विश्वास जिंकण्यात यश मिळवले. भाजपप्रती लोकांमध्ये नाराजी होती, पण लोकांनी त्यांनाच मतदान केले. काँग्रेस पक्षाला आता आपली रणनीती तपासून पाहावी लागेल. भाजपशी थेट लढत झाली की काँग्रेस कमकुवत होते. काँग्रेसने याचा विचार करून आपली रणनीती सुधारावी," असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडीची समीकरणे
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत प्रियंका चतुर्वेदींच्या या विधानाचा संबंध राजकीय विश्लेषक काँग्रेसवर दबाव आणण्याच्या शिवसेना ठाकरे गटाच्या रणनीतीशी जोडत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा भाग आहेत. तिन्ही पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर चर्चा करत आहेत. २०१९च्या तुलनेत ठाकरे सेना महाराष्ट्रात जास्त जागा लढवणार असल्याची चर्चा आहे.