शरद पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार; 'तुतारी' चिन्हावर किती मतं मिळवली?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 10:49 AM2024-10-09T10:49:29+5:302024-10-09T10:51:24+5:30
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांना निवडणूक आयोगाकडून तुतारी चिन्ह देण्यात आले. हरियाणात पवारांच्या राष्ट्रवादीने तुतारी चिन्हावर एकाला उमेदवारी दिली.
चंदीगड - हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पहिल्यांदाच राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यात भाजपाला यश मिळालं आहे. या निवडणुकीत सरकारविरोधी लाट असतानाही भाजपाच्या सुक्ष्म रणनीतीनं विरोधकांचे मनसुबे उधळून लावले. हरियाणात भाजपानं ९० पैकी ४८ जागा जिंकून राज्यात सत्ता कायम राखली तर काँग्रेसला केवळ ३७ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. परंतु हरियाणात शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसनेही एक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभा केला होता.
महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांच्या पक्षाकडील तुतारी चिन्हाच्या दिशेने जोरदार वारे वाहत आहे. लोकसभा निवडणुकीत १० जागा जिंकून त्यातील ८ जागांवर पवारांच्या पक्षाने बाजी मारली. येत्या विधानसभेला अनेक नेते पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. मात्र हरियाणातील असंध विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मराठा वीरेंद्र वर्मा हे निवडणूक लढवत होते. तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या वीरेंद्र वर्मा यांना या मतदारसंघात ४ हजार २१८ मते मिळाली. निकालात ते सहाव्या नंबरला राहिले. या मतदारसंघातून भाजपाचे योगेंद्र सिंह राणा हे ५४ हजार ७६१ मते घेऊन निवडून आलेत. योगेंद्र सिंह राणा यांनी काँग्रेसच्या समशेर सिंह गोगी यांचा २ हजार ३०६ मतांनी पराभव केला. गोगी यांना ५२ हजार ४५५ मते मिळाली.
असंध मतदारसंघात शरद पवारांच्या उमेदवारापेक्षा आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि एका अपक्ष उमेदवाराला अधिक मते मिळाली. या मतदारसंघात बहुजन समाज पार्टीचे गोपाल सिंह यांना २७ हजार ३९६ मते, चौथ्या क्रमांकावर राम शर्मा या अपक्ष उमेदवाराला १६ हजार ३०२ मते तर आम आदमी पक्षाच्या अमनदीप सिंग यांना ४ हजार २९० मते मिळाली आहेत. मराठा वीरेंद्र वर्मा हे हरियाणातील रोड मराठा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचं वीरेंद्र वर्मा हरियाणात नेतृत्व करतात. २०२४ मध्ये वीरेंद्र वर्मा यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. कर्नाल मतदारसंघातून त्यांना २९ हजार मते मिळाली. त्यामुळे लोकसभेनंतर विधानसभेतही वीरेंद्र वर्मा यांनी तुतारी चिन्हावर निवडणुकीत नशीब आजमावलं.
वीरेंद्र वर्मा यांचे निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालं आहे. याआधी त्यांनी बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती त्यात एकदा त्यांनी लाखाच्या वर, तर दुसऱ्यांदा सव्वा दोन लाख मते घेतली होती. ७० हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीत वीरेंद्र वर्मा यांचे डिपॉझिट जप्त झाल्याने ते चर्चेत आले आहेत.
अजित पवारांच्या उमेदवाराचेही डिपॉझिट जप्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही कलानौर विधानसभा मतदारसंघात घड्याळ चिन्हावर उमेदवार उभा केला होता. रणबीर नावाचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढले मात्र त्यांना अवघे ५६ मते पडली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांमध्ये तुतारीच वरचढ असल्याचं दिसून आले.