नवी दिल्ली - निवडणूक निकालाच्या आधी जवळपास सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपाला हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये फटका बसेल असा अंदाज वर्तवला होता. ८ ऑक्टोबरला सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा त्याचप्रकारचे आकडे आणि विश्लेषक टीव्हीवर सुरू झाले. रिपोर्टर मैदानात उतरले होते, ते विविध पक्षाच्या नेत्यांशी बोलत होते. सर्व नेते आपापल्या पक्षाच्या विजयाचे दावे करत होते. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा दावा करत होते.
८ वाजता मतमोजणीत सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी सुरू झाली. थोड्याच वेळात निकालांचे कल समोर येतात. हरियाणा आणि जम्मू काश्मीर दोन्ही ठिकाणी भाजपा पिछाडीवर दिसते. एक्झिट पोलचे आकडे खरे ठरतील असं वाटू लागले. हरियाणात भाजपा ४ तर काँग्रेस ३० जागांवर आघाडी दाखवणारे कल टीव्हीवर प्रसारित झाले. मात्र हळूहळू जागांमधील अंतर कमी झाले. खूप वेळ काँग्रेस आघाडीवर होती त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते उत्साहित झाले, हरियाणात काँग्रेस सरकार बनवणार असा दावा नेत्यांनी केला. हरियाणात काँग्रेसनं बहुमताचा आकडा पार केला असं टीव्हीवर बातम्या झळकल्या तेव्हा भाजपाला २५ जागांची आघाडी होती.
निवडणूक निकालांचा ट्रेंड सुरू होताच तेव्हा निवडणूक आयोगाच्या साईटवर निकालाचे आकडे प्रसिद्ध झाले अन् तिथे ट्विस्ट झाला. हरियाणात काँग्रेसच्या तुलनेने भाजपा पुढे गेली. पाहता पाहता टीव्हीवरील आकडेही बदलले. सर्व चॅनेलवर भाजपा पुढे आणि काँग्रेस पिछेहाट झाल्याचे आकडे आले. हळूहळू भाजपा आणि काँग्रेस यांच्यातील जागांचे अंतर वाढले. त्यानंतर भाजपानं हरियाणात बहुमताचा आकडा पार केला. सुरुवातीला निराश असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट आली. केवळ अर्ध्या तासांत काँग्रेस आघाडीवरून पिछाडीवर आली. हरियाणात काँग्रेसला जवळपास ४३ टक्के मते तर भाजपाला ४० टक्के मते मिळतानाचे आकडे आहेत.
दरम्यान, १२ वाजून ११ मिनिटापर्यंत हरियाणात काँग्रेसला ४०.२५ टक्के आणि भाजपाला ३९.३९ टक्के मते मिळालेली दिसली. अद्याप निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी सुरू आहे. कुठल्याही जागेवरील निकाल घोषित झाला नाही. परंतु ट्रेंडमध्ये भाजपा ४९, काँग्रेस ३५, आयएनएलडी १, बीएसपी १ आणि अपक्ष ४ जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे.