चंदीगडः हरयाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर आज शुक्रवारी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर दिल्लीत पोहोचले आहेत. ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डांसह इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. भाजपाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, खट्टर भाजपाच्या अध्यक्षांसमोर सरकार बनवण्याचा फॉर्म्युला सादर करणार आहेत. तसेच दिल्लीत ते हरयाणातील अपक्ष आमदारांचीही भेट घेणार आहेत. गुरुवारी रात्रीच गोपाल कांडासह सहा अपक्ष आमदारांना चार्टर्ड प्लेन घेऊन दिल्लीत पोहोचले आहेत. हरयाणात बहुमतासाठी आवश्यक जागा कोणालाच न मिळाल्याने तिथे त्रिशंकू स्थिती आहे. या 90 जागा असलेल्या विधानसभेतील केवळ 40 जागा भाजपाने जिंकल्या आहेत. काँग्रेसला 31 जागा मिळाल्या आहेत. जननायक जनता पार्टीने 10 जागा जिंकल्याने त्या पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला किंगमेकर ठरणार असल्याची चर्चा आहे.
हरयाणा निवडणूक 2019: खट्टर पक्षश्रेष्ठींच्या भेटीला, सादर करणार सरकार बनवण्याचा फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 11:34 AM