नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. हरयाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदान करण्यात सुरुवात झाली असून या निवडणुकीत 1169 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.
बहुतांश जागांवर भाजप, काँग्रेस, इंडियन नॅशनल लोकदल (आयएनएलडी ) व जननायक जनता पार्टी यांच्या बहुरंगी लढती होत आहेत. 19, 578 मतदान केंद्रावर 1.83 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. टिकटॉक स्टार सोनाली फोगट, शैलजा कुमारी, योगेश्वर दत्त यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मतदारांना आवाहन केले आहे. ते म्हणाले की, 'हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाचा दिवस आहे. सर्व मतदारांना माझे आवाहन आहे की, आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीच्या पर्वात भागीदार बना.'
दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांनी जाट समाजाच्या भोवतीच रणनिती आखली आहे. 25 टक्के मतदार असणाऱ्या जाट समाजामधून भाजपाकडून 20, जननायक जनता पाटीकडून 33 तर काँग्रेसकडून 25 जाट उमेदवार मैदानात आहेत. तिकीट नाकारल्यामुळे भाजपाच्या काही आमदारांनी बंडखोरी केली असून त्याचा किती फटका बसणार हे निकाला दिवशीच समजणार आहे.
मुख्यमंत्री मनोहर खट्टर, माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा, काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला,कुलदीप बिश्णोई, दुषंत चौटाला, अभयसिंह चौटाला, कुस्तीपटू बबिता फोगाट, योगेश्वर दत्त, टीकटॉक आर्टिस्ट सोनाली फोगट हे प्रसिद्ध चेहरे निवडणुकीत रिंगणात नशीब आजमावत आहेत. यासोबत लाल कुटुंबातील नेते ही मैदानात आहेत.
19,578 मतदान केंद्रावर जवळपास 75 हजार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. 27611 व्हीव्हीपॅट मशिन मतदान केंद्रावर बसवण्यात आले आहेत. तसेच 85 लाख महिला मतदारांसह एकूण 1.83 कोटी मतदार आज मतदानांचा हक्क बजावतील असे मुख्य निवडणूक अधिकारी अनुराग अग्रवाल यांनी सांगितले आहे.