जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. जम्मूमध्ये चार टप्प्यांत तर हरियाणात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. सलग सुट्ट्यांमुळे निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी भाजपाने हरियाणात केली होतीय यावर निवडणूक आयोगाने आज निर्णय दिला आहे.
ही निवडणूक सात किंवा आठ ऑक्टोबरला होण्याची शक्यता होती. १ ऑक्टोबरच्या आसपास विकेंड आणि सुट्ट्या आल्या आहेत. यामुळे लोक मतदानाऐवजी बाहेर फिरण्यासाठी जाणार आहेत. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होऊ शकतो. निवडणूक ठरविताना या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. मतदानाच्या एक दिवस आधी आणि नंतर सुट्टी येत असेल तर अशा तारखा जाहीर करू नयेत, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडौली यांनी म्हटले होते.
दोन वर्षांपूर्वी देखील पंजाब निवडणुकीवेळी अशीच परिस्थिती उद्भवली होती. तेव्हा आयोगाने निवडणुकीची तारीख बदलली होती. १४ फेब्रुवारी २०२२ ला निवडणूक होती. यानंतर दोन दिवसांनंतर लगेचच रविदास जयंती असते. पंजाबचे अनेक लोक यासाठी वाराणसीला जातात. यामुळे ही तारीख बदलून २० ऑक्टोबर करण्यात आली होती.
निवडणूक आयोगाने हरियाणातील मतदानाची तारीख पुढे ढकलण्याची भाजपाची मागणी फेटाळली असून १ ऑक्टोबरलाच निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे मतदानाची टक्केवारी टिकवून ठेवण्याची जबाबदारी आता राजकीय पक्षांना पेलावी लागणार आहे.