नवी दिल्लीः फरिदाबादेतल्या सिव्हिल रुग्णालयात मानवतेला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे. रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावल्यानंतर त्याला रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात येत होतं. त्याचदरम्यान स्ट्रेचरवरून त्याला नेताना रुग्णाच्या कापलेल्या पायांनाच उशी बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर चहूबाजूंनी टीका केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शहरातल्या भूड कॉलनीतील निवासी असलेले 42 वर्षीय प्रदीप शर्मा जवळच्याच एका कंपनीत कामाला होते. प्रदीप बडखल उड्डाणपुलाच्या खाली रेल्वे ट्रॅकजवळ कर्तव्याला होते. त्याचदरम्यान त्यांचे पाय रुळात अडकले, प्रदीप यांनी रुळातून पाय बाहेर काढण्याचा अतोनात प्रयत्न केला. परंतु तत्पूर्वीच भरधाव ट्रेन आली आणि प्रदीप यांचे पाय त्यांच्या शरीरापासून वेगळे झाले. आजूबाजूच्या लोकांनी तत्परता दाखवत त्यांना रुग्णालयात दाखल केलं. सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा कळस पुन्हा एकदा उघड झाला आहे.प्रदीपला स्ट्रेचरवरून नेताना डॉक्टर आणि वॉर्डबॉयनं त्यांच्या पायांनाच उशी बनवली. प्रदीपचे दोन्ही पाय स्ट्रेचरवर उशीच्या स्वरूपात दिसत आहेत. सिव्हिल हॉस्पिटलचे कार्यवाहक अधीक्षक डॉक्टर विनय गुप्ता यांनी सांगितलं की, रुग्णाचा जीव वाचवणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. रुग्णालयात तोकड्या सुविधा असून, रुग्णाला लवकरात लवकर उपचार मिळणं आवश्यक होतं. त्यावेळी जे शक्य होतं ते आम्ही केलं आहे. तर दुसरीकडे रेल्वे पोलीस स्टेशनचे प्रभारी राजपाल म्हणाले, एका व्यक्तीची रेल्वे रुळावर दुर्घटना झाल्याचं समजलं. परंतु आम्ही घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
संवेदनहीनतेच्या सर्व मर्यादा पार; स्ट्रेचरवरच्या रुग्णाच्या कापलेल्या पायांनाच बनवली उशी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 10:40 AM