नवी दिल्ली : हरयाणा राज्य सरकारने मुलींच्या हितासाठी असे काम केले आहे, ज्यामुळे राज्यातील घटते लिंग गुणोत्तर कमी होईल अशी शक्यता वर्तविली जाऊ शकते. आता या राज्यात जन्मलेल्या मुलींना 21 हजार रुपये शगुन म्हणून दिले जाणार आहेत.
हरयाणातील भाजप-जेजेपी युती सरकार आता मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'आपकी बेटी-हमारी बेटी' योजनेबाबत लोकांना जागरूक करणार आहे. अनुसूचित जाती आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांव्यतिरिक्त ही योजना सर्वसामान्य कुटुंबांनाही लागू असणार आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील सरकार मुलींच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे.
दरम्यान, मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी 'आपकी बेटी-हमारी बेटी' योजना शासनामार्फत राबविण्यात आली आहे. राज्यातील मुलींच्या जन्माबाबतच्या सामाजिक दृष्टिकोनात बदल घडवून आणणे, स्त्री भ्रूणहत्या थांबवणे, लिंग गुणोत्तर सुधारणे आणि मुलींना शिक्षणाची योग्य संधी उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
असे मिळतील 21 हजार रुपयेया योजनेंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात जन्मलेल्या अनुसूचित जाती आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील पहिल्या मुलीच्या जन्मावर 21 हजार रुपये आणि सर्व वर्गातील दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलींच्या जन्मावर 21 हजार रुपये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये (LIC) गुंतविले जातात. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडून लाभार्थीच्या नावाने मेंबरशिप सर्टिफिकेट जारी केले जाईल. मेंबरशिप सर्टिफिकेट मुलीची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर इनकॅश केले जाऊ शकेल, पण मुलगी अविवाहित असली पाहिजे.
ऑनलाइन अर्जयोजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्जदाराने सरल पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करावा. अर्जासाठी लाभ घेणाऱ्या मुलीच्या जन्म प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडावी लागेल. त्याचप्रमाणे कौटुंबिक ओळखपत्र क्रमांक, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र (केवळ अनुसूचित जातींसाठी आवश्यक), बीपीएलचा पुरावा आणि वैध बीपीएल क्रमांक (केवळ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी) यासारखी कागदपत्रे आवश्यक असतील.