नवी दिल्ली - अनैतिक कृत्ये आणि गैरव्यवहारांप्रकरणी 'गोरखधंदा' (GorakhDhanda) हा शब्द वापरण्यात येतो. मात्र आता हरियाणाच्या मनोहरलाल खट्टर सरकारने या शब्दाच्या वापरावर बंदी घातली आहे. 'गोरखधंदा' या शब्दामुळे एका समाजाच्या भावना दुखवल्या जात आहेत. यामुळे या शब्दाच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या शब्दामुळे संत गोरखनाथ यांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळेच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे असं हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटलं आहे.
बुधवारी गोरखनाथ समाजाच्या एका प्रतिनिधी मंडळाच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. गोरखधंदा या शब्दाच्या वापराने मनं दुखावली जात आहेत. यामुळे हरियाणात या शब्दावर बंदी घालावी, अशी मागणी समाजाच्या प्रतिनिधींनी केली होता. या शब्दाच्या नकारात्मक अर्थामुळे गोरखनाथ यांच्या अनुयायींच्या भावनांना ठेच पोहोचत आहे, असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
गुरू गोरखनाथ हे महान संत होते. यामुळे कुठल्याही भाषेत, भाषणात किंवा इतर कुठल्या संदर्भात हा शब्द वापरण्याने त्यांच्या अनुयायांचे भावना दुखावल्या जात आहेत. यामुळे कुठल्याही संदर्भात या शब्दाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे, असं खट्टर यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच सरकारकडून याबाबत लवकरच एक अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.