चंदीगढकोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत स्वयंसेवक झालेले हरियाणाचे आरोग्य आणि गृहमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे. विज यांनी ट्विटरच्या माध्यामातून याबाबतची माहिती दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनाही तातडीने कोविडची चाचणी करण्याचं आवाहन विजय यांनी केलं आहे.
"मी कोरोना संक्रमित असल्याचं आढळून आलं आहे. अंबालाच्या सिव्हील रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरू असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी तातडीने कोविडची चाचणी करुन घ्यावी", असं ट्विट अनिल विज यांनी केलं आहे.
विज यांनी घेतला होता 'कोवॅक्सीन'चा डोसहरियाणामध्ये २० नोव्हेंबर रोजी 'कोवॅक्सीन' या कोरोवरील लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली होती. यात अनिल विज यांनी स्वत:हून पुढे येत चाचणीसाठी तयारी दर्शविली होती. २० नोव्हेंबर रोजी विज यांनी कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतला होता. विज यांच्यासोबत २०० जणांना कोवॅक्सीनचा डोस देण्यात आला होता.
दुसरा डोस २८ दिवसांनंतर देणार असल्याचं सांगितलं गेलं होतं. पण त्याआधीच अनिल विज हे कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं आहे. आयसीएमआरच्या संयुक्त विद्यमाने भारत बायोटेक कंपनीकडून कोरोनावर मात करणाऱ्या 'कोवॅक्सीन' या लशीची निर्मिती केली जात आहे.'भारत बायोटेक'चं स्पष्टीकरणअनिल विज यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यावर 'भारत बायोटेक'च्या 'कोवॅक्सीन' या कोरोनावरील लशी संदर्भात प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. त्यावर आता 'भारत बायोटेक'कडून अधिकृत स्पष्टीकरण जारी करण्यात आलं आहे. "कोवॅक्सीनची चाचणी ही दोन टप्प्यात केली जात आहे. या लशीचे दोन डोस घेणं गरजेचं आहे. पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जात आहे. लशीची परिणामकारता ही दोन डोस घेतल्याच्या १४ दिवसांनंतर दिसून येते", असं स्पष्टीकरण 'भारत बायोटक'कडून देण्यात आलं आहे.