उत्तराखंडच्या नैनितालमध्ये हरियाणातील स्कूल बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून त्यात शाळकरी मुलं आणि शिक्षकांचा समावेश आहे. घटनेनंतर रात्री बचावकार्य सुरू करण्यात आले. 29 जखमींना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. नैनितालहून हरियाणात परतत असताना कालाढूंगी नैनिताल मार्गावर हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील नैनितालच्या घटगडजवळ हा अपघात झाला. या अपघातात स्कूल बस खड्ड्यात पडली. जखमींना वाचवण्यात आले आणि त्यांना तात्काळ हल्दवानी आणि कालाढुंगी रुग्णालयात पाठवण्यात आले, ज्यामध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला, त्यानंतर माहिती मिळताच एसडीआरएफ पोलीस आणि एनडीआरएफसह स्थानिक लोकांनी मुलांना बाहेर काढलं.
हरियाणातील हिसार येथील फ्युचर पॉइंट पब्लिक स्कूलची ही स्कूल बस होती. नैनिताल टूरवर शिक्षक आणि मुलं आली होती. नलनीजवळ झालेल्या या अपघातात पाच महिला, एक मुलगा आणि चालकाचा मृत्यू झाला असून, उर्वरित जखमींवर हल्दवानी येथे उपचार सुरू आहेत. सध्या या अपघातातील कारची ओळख पटलेली नाही.
नैनितालच्या डीएम वंदना सिंह यांनी सांगितले की, संध्याकाळी मंगोलीजवळ बसला अपघात झाल्याची माहिती मिळाली. जखमींना सर्वोत्तम उपचार दिले जातील. हिसारमधील मुलं आणि शिक्षक शनिवारी नैनितालला भेट देऊन रविवारी संध्याकाळी घरी परतत होते. या अपघातानंतर जखमींना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.