Yogeshwar Dutt BJP Haryana: हरयाणा विधानसभा निवडणुकीबाबत सर्व राजकीय पक्ष आपापल्या रणनीतीवर काम करत आहेत. दरम्यान, निवडणूक तिकीटाबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा कानावर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कुस्तीपटू आणि भाजपा नेते योगेश्वर दत्तने गोहाना विधानसभेचे तिकीट मागितले आहे. मात्र पक्षाने अरविंद शर्मा यांना तिकीट दिल्याने योगेश्वर दत्तने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामुळे तो नाराज आहे का, असा प्रश्न उपस्थित केले जात आहे.
निवडणुकीबाबत बोलताना योगेश्वर दत्तने सांगितले की, मी मुख्यमंत्री आणि केंद्रीय नेतृत्वासमोर गोहानामधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी यापूर्वीही भाजपाकडून निवडणूक लढवली आहे. यावेळी मला गोहानामधून निवडणूक लढवण्याची संधी मिळावी, अशी माझी इच्छा आहे. योगेश्वर दत्तने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, जेव्हा तुमचं चारित्र्य शुद्ध असूनही तुमची अशी अवस्था का होते? या पापी लोकांना तुमची परीक्षा घेण्याचा अधिकार नाही. त्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या शोधात वाटचाल करा.
योगेश्वर दत्तची आतापर्यंतची राजकीय कामगिरी
२०१२ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या योगेश्वर दत्तने २०१९ मध्ये हरयाणाच्या बडोदा मतदारसंघातून राजकीय इनिंगला सुरुवात केली होती. मात्र या जागेवर त्याचा पराभव झाला. काँग्रेसच्या कृष्णा हुडा यांनी त्याचा पराभव केला. २०१९ मध्ये बडोदा मतदारसंघातून योगेश्वर दत्त पराभूत झाला. त्यानंतर २०२० मध्ये या जागेवर कृष्णा हुडा यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली तेव्हादेखील योगेश्वर दत्तला पराभवाला सामोरे जावे लागले. आता यावेळी योगेश्वर दत्तला भाजपच्या तिकिटावर पुन्हा उमेदवारी हवी आहे.