Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 ( Marathi News ) : मागील काही दिवसापासून हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. दोन दिवसापूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्ये दोन्ही राज्यात भाजपाची पिछेहाट होण्याचा अंदाज दिला होता, तर काँग्रेस मोठी मुसंडी मारणार असल्याचे दाखवले होते. दरम्यान, आता आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून आकड्यांचे कलही समोर आलेत. मतमोजणीच्या सुरुवातीला हरयाणामध्येकाँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत होते. पण, आता आकड्यांमध्ये पुन्हा बदल झाला आहे. आता भाजपा आणि काँग्रेसमध्ये काट्याची लढत दिसत आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी सुरुवातीपासूनच काँग्रेस आघाडीने आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
जम्मू -काश्मीरमध्ये भाजपा मागे पडल्याचे दिसतंय. हरयाणामध्येही सुरुवातीला भाजपा मागे पडली होती, पण आता यात मोठा बदल झाला आहे. भाजपाने मुसंडी मारण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने दोन्ही राज्यात प्रचारादरम्यान डबल इंजिन सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. पण, समोर आलेले आकडे पाहता भाजपा अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.
हरयाणात भाजपा १० वर्षापासून सत्तेत
हरयाणामध्ये मागील दहा वर्षापासून भाजपा सत्तेत आहे. यामुळे भाजपाला तिसऱ्यांदा सत्तास्थापन करण्याबाबत आत्मविश्वास आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये २०१४ मध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी भाजपाने पीडीपीसोबत युती करुन सरकार स्थापन केले होते. पण आता आलेल्या आकड्यांवरुन भाजपाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून या दोन राज्यातील निवडणुकांची चर्चा सुरू आहे. हरयाणामध्ये ९० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये ९० जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झाल्या आहेत. या दोन्ही राज्यात काँग्रेसला पुन्हा एकदा यश मिळेल अशी अपेक्षा नेत्यांनी व्यक्त केली आहे. तर भाजपाच्या नेत्यांनीही हरयाणामध्ये विजयाचा अंदाज व्यक्त केलाय.
जम्मू-काश्मीरमध्ये शेवटच्या निवडणुका २०१४ मध्ये झाल्या होत्या. यावेळची निवडणूक अनेक अर्थांनी खास आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने ही निवडणूक लढवत आहेत, तर भाजप स्वतंत्र निवडणूक लढवत आहे.
आतापर्यंत आलेले कल काय?
आज सकाळपासून या दोन्ही राज्यातील निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. सकाळी १०.१५ वाजेपर्यंत हरयाणामध्ये भाजपा ४८ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस ३४ जागांवर आघाडीवर आहे.
जम्मू-काश्मीरमध्येही आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजपा पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. भाजपा २८ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस आघाडी- ४८ जागांवर आघाडीवर आहे.