हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल येत आहेत. अद्याप मतमोजणी सुरू असली तरी, साधारणपणे चित्र स्पष्ट झाले आहे. हरियाणामध्ये भारतीय जनता पक्ष अर्थात भाजप सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करताना दिसत आहे. तसेच जम्मू काश्मीरमध्येही काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स सरकार स्थापन करताना दिसत आहे. तर जाणून घेऊयात की, हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये भाजपने किती मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले होते आणि किती जिंकले?
भारतीय जनता पक्षाने हरियाणामध्ये दोन मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले होते. यांपैकी, एजाज खान यांना पुनहाना मतदारसंघातून मैदानात उतरवण्यात आले होते. तर नसीम अहमद यांना फिरोजपूर झिरका येथून मैदानात उतरवण्यात आले होते. या दोन्ही जागांवर काँग्रेसनेही मुस्लिम उमेदवारच मैदानात उतरवले होते. पुनहाना येथून काँग्रेसचे मोहम्मद इलियास यांनी एजाज खान यांचा पराभव केला. तर फिरोजपूर झिरकाचे नसीम अहमद हेदेखील काँग्रेसच्या मामन खान यांच्याकडून मागे पडले.
जम्मू कश्मीर विधानसभा निवडणुकीसंदर्भात बोलायचे झाल्यास, भाजपने अनेक जागांवर मुस्लिम उमेदवारांना मैदानात उतरवले होते. मात्र, येथे पक्षाचा पराभवही झाला. एक जागा तर अशी आहे, जेथे भाजपला केवळ 957 मते मिळाली आहेत. उमेदवारांसंदर्भात बोलायचे झाल्यास, भाजपने अनंतनाग विधानसभा मतदारसंघातून सय्यद पीरजादा वजाहत हुसेन यांना तिकीट दिले होते. काँग्रेसचे पीरजादा मोहम्मद सय्यद यांनी त्यांना मागे टाकले आहे.
या जागांवर भाजच्या उमेदवारांचा पराभव -भाजपने अनंतनाग पश्चिम मतदारसंघातून मोहम्मद रफिक वाणी यांना उमेदवारी दिली होती, मात्र नॅशनल कॉन्फरन्सच्या अब्दुल मजीद भट यांनी त्यांचा पराभव केला. पंपोरमधून भाजपने सय्यद शौकत गयूर इंद्राबी यांना उमेदवारी दिली होती, जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सच्या हसनैन मसूदी यांनी त्यांचा पराभव केला. पंपोर येथील भाजप उमेदवाराला केवळ 957 मते मिळाली. शोपियानमध्ये भाजपने जावेद अहमद कादरी यांना उमेदवारी दिली, त्यांचा अपक्ष उमेदवार शब्बीर अहमद कुल्ले यांच्याकडून पराभव झाला. भाजपने राजपोरामधून अर्शीद अहमद भट्ट यांना उमेदवारी दिली होती. त्यांना केवळ 5584 मते मिळाली.
याशिवाय, श्रीगुफवाडा-बिजबेहरा येथून भाजपने सोफी युसूफ यांना मैदानात उतरवले होते. त्यांचा नॅशनल कॉन्फरन्सचे बशीर अहमद शाह यांनी पराभव केला. भाजपने इंदरवालमधून तारक हुसैन यांना उमेदवारी दिली होती, त्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपने बनिहालमधून मोहम्मद सलीम भट यांना उमेदवारी दिली होती, येथे सज्जाद शाहीन यांनी त्यांचा पराभव केला.