Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 :हरयाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत कुस्तीपट्टू विनेश फोगट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. दरम्यान, आज मतमोजणीला सुरुवातीपासून विनेश फोगट यांच्यासह इल्तिजा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला यांनी आघाडी घेतली होती. पण, आता उलटफेर सुरू असल्याचे दिसत आहे.
हरयाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यात सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळपासूनच भाजपाची पिछेहाट असल्याचे पाहायला मिळाले. पण, काही तासानंतर हरयाणामध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपाने पुन्हा एकदा आघाडी घेत काँग्रेसला मागे टाकले आहे. भाजपाची आता तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे.
जुलाना मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगट पिछाडीवर आहेत. तर जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा बिजबेहारा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.ओमर अब्दुल्ला हे गांदरबलमधून पिछाडीवर आहेत. तर दुसरीकडे गोपाल कांडा हे हरियाणाच्या सिरसा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. दुष्यंत चौटाला उचाना कलानमधून पिछाडीवर आहेत. या उमेदवारांची या निवडणुकीत जोरदार चर्चा झाली होती.
१२ वाजेपर्यंत आलेल्या निकालानुसार, हरयाणामध्ये भाजपा ४६ जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस ३६ जागांवर आघाडीवर आहे. तर अन्य ५ जागांवर आघाडीवर आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-एनसी युती ४७ जागांवर पुढे आहे. भाजप २८ जागांवर आघाडीवर आहे. तर पीडीपी ३ आणि इतर १० जागांवर आघाडीवर आहेत.