नवी दिल्ली - केंद्र सरकारचे मंत्री शेतकऱ्यांची चर्चा करताना एक भूमिका घेतात आणि दुसरीकडे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये फूट कशी पाडता येईल, याचेही डावपेच आखतात हे संतापजनक असून गुरुवारी देशभरातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने निवेदन देण्यात येईल, असे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी बुधवारी स्पष्ट केले. याच दरम्यान हरियाणाचे कृषीमंत्री जे. पी. दलाल यांनी शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला आहे.
देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा हा डाव आहे असं देखील दलाल यांनी म्हटलं आहे. "शेतकऱ्यांना पुढे करुन चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांचा भारतात अस्वस्थता पसरवण्याचा डाव आहे. मात्र मोदी काही कमजोर नेते नाहीत. त्यांना आता जनतेचे समर्थन मिळालेलं आहे. कृषी कायदे लागू केल्यानंतरही जनतेनं त्यांना मोठा पाठिंबा दिला होता. शेतकरी रस्त्यावर आले तर यासंदर्भातील निर्णय संसदेत घ्यायचा की रस्त्यावर?" असा सवाल देखील जे. पी. दलाल यांनी उपस्थित केला आहे.
“रस्त्यावर होणारं राजकारण चांगलं नाही. देश प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. शेतकऱ्यांना हाताशी धरुन विरोध केला जातो. मोदीजी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहेत. शेतकऱ्यांनी चर्चा करावी. दिल्लीचे रस्ते बंद करणं किंवा दिल्लीला घेरणं चांगली गोष्ट नाहीय. हे काही लाहोर किंवा कराची नाही" असं देखील दलाल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा. अशी मागणी शेतकरी करीत आहेत. या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. सोनीपतचे जिल्हा दंडाधिकारी श्यामलाल पुनिया यांनी चाचणी करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे.
आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची होणार कोरोना चाचणी, प्रशासनाने दिले आदेश
पुनिया यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आंदोलनात ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांपैकी अंगात ताप असलेल्या शेतकऱ्यांची एक यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. ताप असणाऱ्या शेतकऱ्यांची मोफत कोरोना चाचणी केली जाणार आहे. जर एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्यास अशा शेतकऱ्यांना मोफत सोयी-सुविधा आणि उपचार देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या संकटात आंदोलनासाठी मोठ्या संख्येत शेतकरी एकत्र जमले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढली आहे. आंदोलक करणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोना चाचणीसाठी तयार करणं हे देखील प्रशासनासमोर एक मोठं आव्हान आहे.
"आंदोलन करणारे अनेकजण शेतकरी वाटत नाही"; केंद्रीय मंत्र्यांचं विधान
शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असतानाच केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी या शेतकरी आंदोलनातील अनेकजण शेतकरी वाटत नसल्याचं म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामागे विरोधी पक्षाचा हात असल्याचा आरोप केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे. व्ही. के. सिंह यांनी केलेल्या या विधानामुळे शेतकरी आंदोलनावरुन राजकीय वातावरण तापणार असल्याचं सध्या चिन्ह दिसत आहे. "फोटोमधील अनेकजण शेतकरी वाटत नाहीत. जे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे तेच सरकारने केलं आहे. शेतकऱ्यांना कृषी कायद्याची काहीच अडचण नाही. ज्यांना आहे ते शेतकरी नसून इतर लोकं आहेत. या आंदोलनामागे विरोधी पक्षांबरोबरच कमिशन मिळणाऱ्या लोकांचाही हात आहे" असं व्ही. के. सिंह यांनी म्हटलं आहे.