लोकसभा निवडणुकीचं मतदान जवळ आलं असतानाच हरियाणा काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. हरियाणातील चरखी दादरी येथे पक्षाचा प्रचार करण्यासाठी आलेल्या राहुल गांधींसमोरच किरण चौधरी आणि राव दान सिंह या काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. प्रकरण एवढं वाढलं की अखेरीस हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी राहुल गांधींच्या हाताला धरून त्यांना या दोघांमधून उठवून बाजूला नेले. दरम्यान सभा झाल्यानंतर किरण चौधरी आणि श्रुती चौधरी यांनी राहुल गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही.
हरियाणातील भिवानी महेंद्रगड लोकसभा मतदारसंघातून उमेवारीसाठी श्रुती चौधरी यांचं नाव चर्चेत होतं. मात्र त्यांचं तिकीट कापल्यामुळे वादाला तोंड फुटले होते. तेव्हापासून सुरू झालेला वाद प्रचार अंतिम टप्प्यात आला तरी थांबलेला नाही. दरम्यान, माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांच्या सुनबाई किरण चौधरी आणि काँग्रेसचे उमेदवार राव दान सिंह यांच्यात सुरू असलेला वाद आता प्रचारादरम्यान, उघडपणे दिसू लागला आहे. त्यात आज राहुल गांधी हे प्रचारासाठी चरखी येथे आले असताना सभास्थळी राहुल गांधी यांच्या एका बाजूला किरण चौधरी तर दुसऱ्या बाजूला राव दान सिंह बसले होते.
याचदरम्यान, राहुल गांधी यांच्यासमोर मंचावरच दोन्ही नेत्यांमध्ये वादावादी झाली. हा वाद एवढा वाढला की, जवळच उभे असलेल्या भूपेंद्र सिंह हु्ड्डा यांना राहुल गांधी यांच्याजवळ यावं लागलं. त्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांना या नेत्यांच्या मधून उठवले आणि दूर नेले. सभेनंतर किरण आणि श्रुती चौधरी यांनी राहुल गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते न भेटताच निघून गेले. दरम्यान, या सभेनंतर किरण चौधरी ह्या प्रसारमाध्यमांना टाळताना दिसल्या. तसेच श्रुती यांनाही चर्चेदरम्यान, आपल्यासोबत घेऊन गेल्या. मात्र भरसभेत राहुल गांधींसमोर किरण चौधरी आणि राव दान सिंह यांच्यात झालेला वाद चर्चेचा विषय ठरला.