बेगुसराय : भाजपने महाराष्ट्र, हरयाणा आणि आता दिल्ली देखील जिंकली आहे. आता बिहारची वेळ आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बिहार निवडणूक लढवणार आणि जिंकणार आहोत. नितीश कुमार यांच्यासारखा अनुभवी मुख्यमंत्री कोणाकडेही नाही, असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन (Shahnawaz Hussain) यांनी केले आहे.
बेगुसराय येथे गुरुवारी (दि.२०) शाहनवाज हुसैन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शाहनवाज हुसैन यांनी रेखा गुप्ता यांचे दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच, आज देशातील महिला आनंदी आहेत. भाजपचे अनेक राज्यांमध्ये मुख्यमंत्री आहेत, पण दिल्लीत एक महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत, असे शाहनवाज हुसैन यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी हे बिहारमधील भागलपूरमध्ये येणार आहेत. याबाबतची माहिती देताना शाहनवाज हुसैन यांनी सांगितले की, पंतप्रधान भागलपूरमध्ये येत आहेत. येथे ते शेतकऱ्यांना भेटतील. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त काम केले आहे. त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी काम केले जात आहे. बिहारमध्ये इथेनॉल प्लांट बसवले आहेत. बिहारमध्ये १७ इथेनॉल प्लांट उभारण्याची परवानगी देण्यात आली होती, त्यापैकी १२ ते १३ प्लांट उभारण्यात आले आहेत.
पुढे शाहनवाज हुसैन म्हणाले की, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये एनडीए सरकार सुरू आहे आणि ते चांगले काम करत आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार पुढे जात आहे. याचबरोबर, लालू यादव यांना भारतरत्न देण्याबाबत तेजस्वी यादव यांच्या विधानाबाबत शाहनवाज हुसैन म्हणाले की, माजी मुख्यमंत्री जननायक कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न मिळाला, त्यांची लालू यादवांशी तुलना करणे योग्य नाही. लालू यादव अजूनही जामिनावर आहेत.